सोलापूर : शहरातील कोंतम चौक येथील रंगरेज कलेक्शन व रंगरेज फॅमिली वेअर या कपड्यांच्या दुकानाना अचानक आग लागून कपड्यांचे नुकसान झाले. गुरुवारी रात्री 10.20 वाजता ही घटना घडली. महापालिका अग्निशामक दलाने तत्काळ ही आग आटोक्यात आणली.
कोंतम चौक येथील रंगरेज कलेक्शन व रंगरेज फॅमिली वेअर या कपड्यांच्या दुकानाला आग लागली. भाजपचे माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेवक विनायक विटकर, अविनाश पाटील, राजकुमार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी या संदर्भात अग्निशामक दलास माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे सहाय्यक अधीक्षक अच्युतराव दुधाळ यांनी तत्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या पाठविल्या.
अग्निशामक दलाकडून तात्काळ कार्यवाही करून तीन गाड्या पाण्याचा फवारा मारून संपूर्ण आग विझवण्यात आली. अग्निशामकलाच्या त्वरित कार्यवाहीमुळे दुकानातील इतर साहित्य व शेजारील दुकाने यांचे मोठे नुकसान झाले नाही. या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही, असे अग्निशामक दलाचे सहाय्यक अधीक्षक अच्युतराव दुधाळ यांनी सांगितले.


















