सोलापूर – अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर मार्गशीर्ष शुक्ल पंचमीदिनी झालेल्या केशरी ध्वजारोहण सोहळ्याच्या प्रेरणेने सोलापूर शहरात ‘श्रद्धा व स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. विवाह पंचमी आणि शीख गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या हुतात्मा दिनाचे औचित्य साधत श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारीचा त्रिवेणी संगम साधण्याचा हा उपक्रम ठरला.
शहरातील काही मंदिर परिसरात दुभंगलेल्या देवी–देवतांच्या मूर्ती, संत–महापुरुषांच्या छायाचित्रांचे विटंबन तसेच धार्मिक ग्रंथांचे ढिगारे अत्यंत अवमानकारक अवस्थेत आढळून येत असल्याने जगदंब प्रतिष्ठान सामाजिक बहुउद्देशीय संस्था (अध्यक्ष विजय यादव, उपाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, सचिव किरण पंगुडवाले) यांनी मा. केतनभाई शहा आणि महापौरांकडे निवेदन दिले. या निवेदनाची महापालिकेकडून तात्काळ दखल घेऊन विशेष ‘श्रद्धा वाहन’ पाठविण्यात आले. या वाहनाद्वारे दुभंगलेल्या मूर्ती व पवित्र छायाचित्रांचे सन्मानपूर्वक संकलन करण्यात आले.
याच अनुषंगाने गणपती घाट व श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. स्वयंसेवक, सामाजिक–आध्यात्मिक संस्था, महापालिका कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी सहभागी होत परिसर स्वच्छतेसह भक्तिमय वातावरण निर्माण केले.
जगदंब प्रतिष्ठानने सादर केलेल्या निवेदनात
– दुभंगलेल्या मूर्ती व छायाचित्रांचे सन्मानपूर्वक विसर्जन,
– श्रद्धास्थानांचे संरक्षणार्थ महापालिकेने जनजागृती उपक्रम राबविणे,
– पालिका हद्दीतील मंदिरांची पाहणी करून दर दोन दिवसांनी ‘श्रद्धा वाहन’ चालविणे व धार्मिक ग्रंथांचे संकलन करून वाचनालयाकडे सुपूर्द करणे,
– घंटागाडीऐवजी सन्मानपूर्ण वाहनाची कायमस्वरूपी व्यवस्था करणे,
या मागण्या करण्यात आल्या.
संध्याकाळी गणपती बाप्पा आरतीनंतर दीपप्रज्वलन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना मा. केतनभाई शहा म्हणाले,
“पवित्र मंदिरांचे, मूर्तींचे आणि धार्मिक स्थळांचे रक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. श्रद्धास्थानांचे संरक्षण म्हणजे संस्कृतीचे संरक्षण. नागरिक जागरूक झाल्यास विटंबनाची पुनरावृत्ती होणार नाही.”
या उपक्रमात राहुल शिंदे (संत संपर्क जिल्हा संयोजक), सामाजिक कार्यकर्ते चांगदेव जाधव, स्वयंसेवक उत्तम प्रल्हाद खंदारे तसेच स्थानिक नागरिक व महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
अयोध्येच्या प्रेरणेने सोलापूरात राबविण्यात आलेला हा उपक्रम स्वच्छता, श्रद्धेचा सन्मान आणि संस्कृती संवर्धनाचे सुंदर उदाहरण ठरले आहे.

















