अंबड / जालना – अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा कै.शारदाताई अंकुशराव टोपे यांचे जन्मदिनानिमित्त ७ डिसेंबर २०२५ रोजी कारखाना कार्यस्थळावरील त्यांचे अर्धाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी बोलतांना राजेश टोपे साहेब म्हणाले की, कै.शारदाताई यांनी कारखान्याचे अध्यक्षा म्हणून अत्यंत सचोटीने काम केले. त्यांनी आयुष्यभर टोपे साहेबांना खंबीरपणे साथ दिली आहे. आई म्हणून व्यक्तीशः माझ्या व माझ्या परिवाराच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे स्मारक हे समर्थ परिवाराचे शक्तीस्थळ व उर्जास्त्रोत आहे. त्यांची शिकवण, त्यांचे ध्येय समोर ठेवून व विचार सोबत घेऊन आपणही काम करीत आहोत.
कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२५-२६ करीता एकुण ३५ हजार ३५८ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झाली आहे. यापासून ३० लाख मे.टन ऊस गळीतास उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.
युनिट नं.१ व २ कडील प्रत्यक्ष ऊस गळीतास दिनांक ०५/११/२०२५ रोजी सुरुवात झाली. दिनांक ०६/१२/२०२५ अखेर दोन्ही युनिट मिळून ३ लाख ३० हजार मे.टन ऊसाचे गळीत झाले आहे. तसेच युनिट नं.१ कडील डिस्टीलरीमध्ये ४९ लाख ७२ हजार बल्क लिटर्स अल्कोहोल व ४२ लाख ५५ हजार बल्क लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. सहवीज निर्मीती प्रकल्पामधून ६९ लाख ३२ हजार युनिट वीज निर्मीती झाली असून ४२ लाख ३८ हजार युनिट वीज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस विक्री केली आहे.
युनिट नं.२ (सागर) तिर्थपुरीकडील डिस्टीलरीमध्ये २१ लाख ९७ हजार बल्क लिटर्स अल्कोहोल व १८ लाख ८ हजार बल्क लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.
गळीत हंगाम २०२५-२६ करीता गळीतास येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता रु.२८००/- (दोन हजार आठशे फक्त) प्रती मे.टन देण्याचा निर्णय मा.संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार संबंधीत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर सदरची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
।धोरणाप्रमाणे पुढील हप्ते देण्यात येतील. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांनी केले.
पहिला हप्ता रु.२८००/- प्रती मे.टन प्रमाणे ऊसाच्या बिलाची रक्कम खात्यावर जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण परसले असून अनेक ऊस उत्पादकांनी कारखान्याचे मार्गदर्शक राजेश टोपे साहेब व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.
या प्रसंगी टोपे परिवारातील सर्व सदस्य, विविध संस्थांचे प्रदाधिकारी, कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, इतर अधिकारी, कर्मचारी, कामगार व परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.


















