
मोटारसायकल चोरीच्या सोलापूर शहरातील घटनांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील व सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांनी गुन्हे शाखेला कडक निर्देश दिले होते. यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने शहर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे सखोल तांत्रिक विश्लेषण सुरू केले होते.
दरम्यान गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलिसांनी १२ जुलै रोजी हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड परिसरात सापळा रचला. यावेळी वरील आरोपी सत्यवान भोसले याला एका होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपीने पोलिसांना दिशाभूल करणारी उत्तरे दिली, परंतु सखोल चौकशीअंती त्याने वसंत विहार परिसरातून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.त्यानंतरच्या चौकशीत आरोपीने सोलापूरसह धाराशिव, सातारा आणि कर्नाटक राज्यातून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी सोलापूर शहरातील ७, धाराशिव जिल्ह्यातील ५, सातारा जिल्ह्यातील १ आणि कर्नाटक राज्यातील १ असे चोरीच्या एकूण १४ मोटर सायकली जप्त करून मोटर सायकल चोरीचे एकूण १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.






















