अहिल्यानगर – कुमार व मुलींच्या ५१व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत अंतिम फेरीचा महामुकाबला निश्चित झाला असून कुमार गटात गतविजेत्या धाराशिवची लढत सोलापूरशी, तर मुली गटात सांगली व ठाणे यांच्यात विजेतेपदासाठी थरार रंगणार आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या धाराशिवला ठाण्याने ४०–२३ असा दणदणीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यांनी मध्यंतरापासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवत १६–१० अशी आघाडी घेतली होती. ठाण्याच्या विजयात अक्षरा भोसलेने १६ गुण व १.१० मिनिटे पळतीचा खेळ सादर करत सिंहाचा वाटा उचलला. दीक्षा काटेकर (१.१७ मि. संरक्षण व ६ गुण), वैष्णवी जाधव (१, १.५८ मि. संरक्षण व ६ गुण) यांनीही चमकदार खेळी करत विजय पक्का केला. पराभूत धाराशिवकडून मैथिली पवार (२.३० मि. व १० गुण) एकटीने निकराचा प्रतिकार केला, तर श्रावणी गुंड व दुर्गा भोसले यांनी प्रत्येकी ४ गुण वसूल केले पण त्या आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.
मुलींच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात गत उपविजेत्या सांगलीने सोलापूरला २६–२३ असे १.५० मिनिटे राखून ३ गुणांनी हरवले. सांगलीकडून सानिया सुतार (१ मि. संरक्षण व ८ गुण) आणि सानिका चाफे (२.५०, नाबाद १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. तर पराभूत सोलापूरच्या स्नेहा लामकाने (२.५०, १ मि. संरक्षण व ८ गुण) व प्राजक्ता बनसोडे (१.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
लघुत्तम आक्रमणाच्या तृतीय स्थानाच्या सामन्यात धाराशिवने सोलापूरला २४ सेकंदांनी हरवले.
——-
सोलापूरचा ‘ड्रीम’ गुणावर रोमांचकारी विजय
कुमारांच्या पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरने सांगलीला ३९–३८ असे एकाच गुणावर नमवित अंतिम फेरीत धडक मारली. नवीन नियमातील ‘ड्रीम’ गुण निर्णायक ठरला. मध्यंतरास १८–२० अशी पिछाडी असतानाही सोलापूरने शानदार पुनरागमन केले. त्यांच्या सिद्धार्थ माने देशमुख (१.५० मि. व ८ गुण), सुहाना आत्तार (१.३५ व ६ गुण), अरमान शेख (६ गुण) व शंभूराज चंदनशिव (६ गुण) यांनी आक्रमणाची धार कायम ठेवली. तर पराभूत सांगलीच्या अथर्व पाटील (३.१५ मि. संरक्षण व ८ गुण) व श्री दळवी (२ मि. संरक्षण व ४ गुण) यांचे प्रयत्न विजयासाठी अपुरे ठरले.
———
धाराशिवची पुण्यावर मात
कुमारांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या धाराशिवने पुण्यावर ३२–१९ अशी मात केली. मध्यंतराची १२–१८ ही पिछाडी पुण्यास महागात पडली. धाराशिवकडून सोत्या वळवी (१, १.१० मि. संरक्षण व ८ गुण), जितेंद्र वसावे (२.२० मि. संरक्षण व २ गुण) व राज जाधव (२ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी चमकदार खेळी केली. तर पराभूत पुण्याच्या शंकर यादव (१२ गुण) व आदेश पाटील (१.३०, २ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी कडवी झुंज दिली.
तृतीय स्थानाच्या लघुत्तम आक्रमणाच्या सामन्यात सांगलीने पुण्यावर १.०३ मि. राखून विजय मिळवला.
——-
आता रंगणार सुवर्ण थरार
कुमार गटात सोलापूर विरुद्ध धाराशिव, तर मुली गटात ठाणे विरुद्ध सांगली या अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मैदानावर दमदार कौशल्य, वेग, चातुर्य आणि रणतंत्राची आतषबाजी बघायला मिळणार आहे.
















