सोलापूर – गुजरात प्रांत पद्मशाली युवजन संघम तर्फे आयोजित युवा मेळावा आणि गुजरात प्रांत पदाधिकाऱ्यांची निवड अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरत येथे संपन्न झाली. पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या अध्यक्षतेखाली, अखिल भारत पद्मशाली संघाचे अध्यक्ष कंदाकटला स्वामीजी, महेश जिंदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य मेळावा पार पडला.
मेळाव्याची सुरुवात समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते समाजाच्या प्रश्नांवर झालेली सखोल चर्चा आणि त्यातून झालेले ठोस निर्णय. समाजाच्या आर्थिक उन्नतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. तसेच शैक्षणिक प्रगती, रोजगारनिर्मिती, उद्योजकता, वंचित घटकांचे पुनर्वसन, समाजातील युवा संघटनांची बळकटी या विषयांवर अनेक निर्णय मेळाव्यात घेण्यात आले.
पद्मशाली समाजाचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्याचा निर्धार करताना राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा म्हणाले, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू. पद्मशाली समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. भारतभरातील विविध राज्यांतील तसेच अनेक जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्यामुळे मेळाव्याला विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्या अखिल भारत पद्मशाली युवा जनसंघमचे अध्यक्ष श्रीनिवास रुद्रा, गोपाल पामू व नागेश जीगजारला तसेच सुरत मधील युवा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
















