पिलीव – 2025 – 26 च्या ऊस गाळप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगामाच्या सुरुवातीस उसाची पहिली उचल जाहीर करण्यास टाळा टाळ केली होती यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून कारखानदारांना ऊस दर जाहीर करावा असे निवेदनाद्वारे आवाहन करण्यात आले होते. यानुसार सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्यातील अनेक साखर कारखानदारांनी उसाची पहिली उचल 2800 ते 2850 इतकी जाहीर केली परंतु ही उचल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परवडत नव्हती .
यामुळे माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली चांदापुरी येथील ओंकार साखर कारखान्यासह इतर साखर कारखान्यांना निवेदन देऊन उसाची पहिली उचल जाहीर करा अन्यथा कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला होता .यानुसार ओंकार साखर साखर कारखान्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला येत्या चार दिवसांमध्ये उसाचा पहिली उचल जाहीर करतो असे लेखी आश्वासन दिले होते. यानुसार सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी ओंकार साखर कारखान्याने 2025 _26 च्या गाळप हंगामातील उसाची पहिली उचल 3050/- रुपये जाहीर केले व दीपावली सणानिमित्त शेतकऱ्यांना शंभर रुपये देणार असा एकूण 3150/- रुपये दर जाहीर केला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांना ओंकार साखर कारखान्याकडून लेखी पत्र दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
चौकट
तालुक्यातील काही कारखानदारांनी पहिली उचल 2800/- ते 2850/- रुपये इतकी जाहीर केले आहे ही उचल म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे उसाची पहिली उचल कमीत कमी 3400/- इतकी असावी यासाठी आम्ही मागणी केली होती. परंतु ओंकार साखर कारखाना प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन उसाची पहिली उचल 3050/- रुपये व दीपावलीसाठी 100/- रुपये देऊ असे लेखी पत्र दिले आहे आमचे समाधान नाही . आगामी काळात निश्चित अजून वाढीव दर द्यावा अशा अपेक्षा आहे.
अजित बोरकर ,स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष.
फोटो _ ओंकार साखर कारखान्याच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दराबाबत लेखी आश्वासन देताना.
















