बार्शी – बार्शी तालुका पोलिसांनी कारवाई करत एका इसमाच्या हातातून देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार अरबाज जिलाजी जमादार हा इसम संजयनगर, वैराग येथे राहणारा असून तो संशयास्पद रीतीने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर पोलिसांनी शेंद्री परिसरात त्याला अडवून झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून बेकायदा पिस्तुल, एक जिवंत काडतूस, पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रसन्न यावलकर आणि उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे तसेच पोलीस हवालदार केकान, पोलीस सुरेश बिडवे, पोलीस राहुल बोंदर, पोलीस युवराज गायकवाड यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई राबवली.
आरोपी पिस्तुल कोणत्या कामासाठी बाळगत होता, त्याचा कोणत्या गटाशी संबंध आहे, तसेच शस्त्राचा पुरवठा कुठून झाला याबाबतचा तपास सुरु आहे. आरोपीवर पोलिसांनी योग्य कलमांन्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

























