सोलापूर- श्री ऐ.प.दि. जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला येथे श्रध्देय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्म शताब्दी महोत्सवांतर्गत थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती तथा राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याऔचित्याने शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यामध्ये ९० विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना प्रस्तुत केल्या. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ तसेच पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, ज्येष्ठ शिक्षक राजेश मोहोळकर, सुभाष नागरसे, संजय भस्मे, संजय पंडित, रोहिता शहा आदी उपस्थित होते.
प्रारंभी सहशिक्षिका रोहिता शहा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तद्नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी ९वीतील ओजस फटाले याने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले, त्यानंतर गणित-विज्ञान शिक्षक सुभाष नागरसे यांनी आपल्या मनोगतातून गणिततज्ञ रामानुजन यांच्या संशोधन कार्याचा आढावा घेतला. तद्नंतर गणित-विज्ञान शिक्षक संजय भस्मे यांनी विज्ञान प्रदर्शनातील नाविण्यतेविषयी व संशोधन क्षेत्रातील शासकीय योजनांविषयी माहिती सांगितली.
अध्यक्षीय मनोगतात उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सर्जनशील विचार करून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेने शालेय जीवनापासूनच संशोधनवृत्ती अंगी बाळगण्याचे आवाहन केले.
या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी सुभाष उपासे, बाबासाहेब मगदूम, जितेंद्रकुमार डहाळे, प्रसाद कुलकर्णी, नागनाथ येळेगाव, पूजा काटकर आदी गणित-विज्ञान विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काटकर यांनी केले तर नागनाथ येळेगाव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
















