सोलापूर : इंग्रजी भाषा ही जरी जागतिक भाषा असली तरी मराठी ही ज्ञानाची आणि प्रगतीची भाषा आहे. यशाच्या, साफल्याच्या पंढरपुरला घेऊन जाणारी ही भाषा आहे त्यामुळे मराठी भाषेची आराधना करा असे आवाहन ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.
मनोरमा सोशल फाऊंडेशन संचलित मनोरमा साहित्य मंडळी आणि मसाप पश्चिम सोलापूर यांच्यावतीने हाँटेल बालाजी सरोवर येथील सदाशिवराव मोरे सभागृहात आयोजित मनोरमा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष तथा मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
दिवसभर चाललेल्या या संमेलनात मुलाखत, परिसंवाद, कवी संमेलन, व्याख्यान, पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम पार पडले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, गोवा साहित्य अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत, मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे, माजी कामगार आयुक्त संभाजीराव काकडे, वात्रटीकाकार रामदास फुटाणे, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष शोभा मोरे, कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यावेळी उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात विश्वास पाटील यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगीतले.मराठी भाषेबाबत जाग्रुत होऊन विचार करण्याची गरज आहे. मुलगा संस्कारी व्हावा असे वाटत असेल तर आईच्या कंठातले शब्द त्याला शिकवा असे ते म्हणाले. २०१२ मध्ये ज्यादिवशी मंत्रालयातील कारकूनाने मराठी शाळांच्या तुकड्यांना परवानगी मिळणार नाही असा अध्यादेश काढला तो दिवस मराठीवर प्रेम करणाऱ्यांनी काळा दिवस पाळावा असेही विश्वास पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, मनोरमा बँकेने किती कोटीच्या ठेवी जमवल्या यापेक्षा अधिक सामान्य माणसांचा विश्वास आणि प्रेम संपादन केले. हीच खरी अनमोल ठेव आहे. मनोरमाने लक्ष्मी आणि सरस्वतीची उपासना केली असून त्यामुळेच साहित्य संमेलन ऐश्वर्यसंपन्न झाले आहे.
अनिल सामंत यांनी यावेळी मराठी आणि कोकणी भाषेतील साहित्याचा आढावा घेतला. गोमंतकीय साहित्यात अनेकांनी चांगले लेखन केले असूनही आजवर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला नाही याबद्दलची खंत व्यक्त केली.
डॉ. रविंद्र शोभणे, संभाजीराव काकडे,रामदास फुटाणे,चैतन्य भंडारे,ना.म.शिंदे यांचीही यावेळी भाषणे झाली. त्यांनी मराठी भाषेचा भविष्यकाळ तसेच मनोरमा साहित्य संमेलन याविषयीची आपली मते मांडली. फुटाणे यांनी काही वात्रटिका सादर करुन संमेलनात खसखस पिकवली.
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आपल्या भाषणात मराठी का मागे पडत आहे याची कारणे सांगीतली. पुढच्या वर्षी २६ जुलै रोजी विद्यापीठात बहुभाषिक साहित्य परिषद आयोजित केल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष शोभा मोरे यांनी स्वागत केले. मनोरमा बँकेने अर्थकारणाबरोबरच सरस्वतीची पुजा मांडली आहे. पंचवीस वर्षापूर्वी मनोरमा संमेलनाला सुरुवात झाली. घरोघरी मराठी पोहोचली पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे.
संमेलनाच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. साहित्य समाज मनाचा आरसा आहे. समाजातील गुन्हेगारीकरण कमी करण्यासाठी माणसाच्या मनाची मशागत करावी लागेल. मनोरमा परिवार गेली पंचवीस वर्षे हेच काम साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करीत आहे. यामध्ये परिवारातील सर्वांचा सिंहाचा वाटा आहे.
या संमेलनात श्रीकांत मोरे आणि शोभा मोरे यांच्या डायरीतील शेवटचे पान या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी मनोरमा साहित्य संमेलनाचे कार्यवाह संतोष सुरवसे, संयोजक डॉ. सुमित मोरे, ऋचा मोरे, आदिश पायगुडे, जयू भाटकर, राजन लाखे उपस्थित होते.
मराठी भाषा दोन हजार वर्षापूर्वीची : श्रीकांत मोरे
अध्यक्षीय भाषणात श्रीकांत मोरे म्हणाले, मराठी भाषा दोन हजार वर्षापूर्वीची आहे. बोली भाषेतून ही विकसीत झाली. आता डिजिटल माध्यमांचे युग आहे. या डिजिटल भाषेतील इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे ही भाषा संशोधकांची जबाबदारी आहे. यावेळी मोरे यांनी सोलापुरातील साहित्यीकांनी मराठी साहित्य संम्रुध्द होण्यासाठी दिलेले योगदान विशद केले. अशा दोनशेपेक्षा अधिक साहित्यीकांचा मनोरमा परिवाराने पुरस्कार देऊन सन्मान केला, असेही त्यांनी सांगीतले. मनोरमा राज्यस्तरीय साहित्य संमेलन गोव्यात भरण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.
अंतर्मुख करणाऱ्या सरस कविता
संमेलनाच्या कार्याध्यक्ष अस्मिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यमैफलीत राजन लाखे, अशोक भांडवलकर, माधव पवार, विमल माळी, डॉ. श्रुतीश्री वडकबाळकर, डॉ. मनीषा अतुल, डॉ. राधिका देशमुख, वंदना कुलकर्णी, गोविंद काळे, किरण येले, डॉ.स्मिता पाटील, अँड. सुजाता जाधव, स्वाती कुलकर्णी, मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले, कालिदास चवडेकर, बदिउज्जमा बिराजदार, इंद्रजीत घुले, निलोफर फणिबंद, शारदा तालीकोटी, बागेश्री सराफ, विशाखा देशपांडे यांनी कविता सादर केल्या.
—–






















