अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील एच.जी. प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. आनंद मेळावा कार्यक्रमाचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य शंकर व्हनमाने यांच्या मुख्य उपस्थितीत प्राथमिक शिक्षक सोसायटीचे तालुका अध्यक्ष बसवराज खिलारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक, शिक्षिका, यांच्यासह प्रचंडे प्रशालेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या आनंद मेळाव्यात स्वदेशी विविध खाद्यपदार्थाचे रेलचेल मोठ्या प्रमाणात होती. भारतीय खाद्यपदार्थांची विविधता यामध्ये दिसून आली. या आनंद मेळाव्याने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळाला . लहानपणापासूनच विविध वस्तूंच्या खरेदी विक्रीचे आर्थिक व्यवहार समजण्यास मदत झाली. त्यामुळे प्रशालेच्या लहान विद्यार्थी विद्यार्थिनीने पाणीपुरी, भेळ, वडापाव, कच्ची दाबेली, गाजराचा हलवा, पुरी भाजी, संगम वडा, आईस्क्रीम, विविध पेय आनंद मेळाव्यात विक्रीसाठी आणले होते .
बॉलआणि ग्लास, इलेक्ट्रिक जादू आदी गमती जंमती मोठ्या आनंदात सादर करून आनंद मेळावा आनंदात पार पडला. आनंद मेळाव्याला बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. या मेळाव्यामध्ये परिसरातील सर्व जिल्हा परिषद मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका, लहान चिमुकले यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालक, माजी विद्यार्थी आदी जणांचा समावेश होता.
सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रचंडे प्रशालेतील प्राचार्य शंकर व्हनमाने यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

























