सोलापूर – जिज्ञासू वृत्ती, कल्पनाशक्ती आणि दूरदृष्टी यांच्या बळावरच दर्जेदार संशोधन घडू शकते. संशोधनाच्या माध्यमातूनच ‘विकसित भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येईल. त्यामुळे संशोधकांनी विविध विषयांवर काम करताना योग्य संशोधन साहित्य (मटेरियल) निवडावे आणि त्या साहित्याचा समाजोपयोगी व तंत्रज्ञानाभिमुख वापर कसा होईल, याचा सखोल विचार करावा, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुल आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (BIRAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फंक्शनल मटेरियल्स अँड अॅप्लिकेशन्स’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. बी. जे. लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेचे प्रास्ताविक व स्वागत समन्वयक डॉ. विकास पाटील यांनी केले.
डॉ. पी. एस. पाटील पुढे म्हणाले की, फंक्शनल मटेरियल्स हा आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा राष्ट्रीय परिषदांमुळे संशोधकांना नवे विचार, नवी दिशा आणि परस्पर संवादाची संधी मिळते. संशोधन करताना विज्ञान व तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून नवोन्मेष कसा साधता येईल आणि त्या संशोधनाचा उद्योग, समाज व देशाच्या प्रगतीसाठी कसा उपयोग होईल, याकडे संशोधकांनी लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, फंक्शनल मटेरियल्स हे मानवी जीवनाच्या प्रत्येक घटकाशी निगडित आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये विविध प्रकारच्या मटेरियल्सचा वापर झालेला असतो. त्यामुळे भौतिकशास्त्राचे अभ्यासक आणि संशोधक यांनी संशोधन करताना समाजाला अधिकाधिक उपयोग होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. देशाच्या विकासामध्ये संशोधनाचा मोठा वाटा असून संशोधनाच्या माध्यमातूनच आपण जागतिक स्तरावर पुढे जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या राष्ट्रीय परिषदेत देशभरातून ३०० हून अधिक अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. परिषदेत डॉ. एस. एच. पवार, डॉ. प्रकाश वडगावकर, डॉ. राजीव जोशी, डॉ. ए. एन. जाधव, डॉ. एस. बी. सरताळे, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. अनिल घनवट यांच्यासह अनेक नामवंत तज्ज्ञ उपस्थित होते.
परिषदेदरम्यान संशोधन पेपर सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि संशोधकांनी आपले नवसंशोधन मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्वी पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. उजमा बांगी यांनी मानले.
———
फोटो ओळी-
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित ‘फंक्शनल मटेरियल्स अँड अॅप्लिकेशन्स’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. बी. जे. लोखंडे व समन्वयक डॉ. विकास पाटील.

























