सोलापूर: सोलापूर सोशल असोसिएशनच्या उर्दू प्रायमरी शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या पालक-शिक्षक सभेत, उर्दू माध्यमांमधून १९९७ मध्ये १०वीच्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्राच्या मेरीट लिस्टमध्ये प्रथम स्थान मिळवणारे ऐतिहासिक व्यक्तीमत्व तन्वीर मनियार यांनी विशेष मार्गदर्शन केले. ते गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये स्थायिक असून, सध्या वैयक्तिक दौऱ्यावर भारतात आले आहेत.
यावेळी व्यासपीठावर तन्वीर मनियार, मुख्याध्यापक डॉ. आसिफ इक्बाल, नवनियुक्त केंद्रप्रमुख सोहेल नाईक, इम्तियाज शेख, ॲड. शाहभाई , जमीर शेख आदी उपस्थित होते.
तन्वीर मनियार हे सोशल उर्दू प्रायमरी शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, तर १२वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी सोशल मधूनच पूर्ण केले आहे. त्यांना सुरुवातीपासूनच आपल्या शाळेबद्दल विशेष आपुलकी आहे. सोशल उर्दू प्रायमरी शाळेत दरवर्षी पालक-शिक्षक सभा अत्यंत नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक आयोजित केली जाते.
मुख्याध्यापक डॉ. आसिफ इक्बाल यांनी आलेल्या सर्व पालक व पाहुण्यांचे स्वागत करताना पालकांना मार्गदर्शन केले आणि सांगितले की, मुले ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर एका विशिष्ट मिशन अंतर्गत लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सर्व पालकांनी शाळा, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संपर्कात राहावे, वेळेचे पालन, स्वच्छता आणि मुलांच्या भविष्याबाबत सतत चर्चा करत राहावी. त्यांनी पुढे सांगितले की, माणसाचा मेंदू आयुष्यभर विचार करण्याचे आणि समजून घेण्याचे काम मातृभाषेतच करतो, म्हणूनच मुलांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण घेणारी मुले आपल्या आयुष्यात खूप लवकर यशस्वी होतात. डॉ. आसिफ इक्बाल म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रातील एक महत्त्वाची व्यक्ती तन्वीर मनियार आज आपल्यात उपस्थित आहेत, हे आपले भाग्य आहे. ते आपल्या अनुभवांच्या आधारे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्यांचा मोलाचा सल्ला आपल्याला लाभेल.
संस्थेचे विश्वस्त इम्तियाज शेख यांनी प्राथमिक शिक्षणातील आई-वडिलांच्या भूमिकेवर बोलताना सांगितले की, पालकांनी आपल्या मुलांचे शैक्षणिक नियोजन अत्यंत विचारपूर्वक केले पाहिजे. आज सोशल मीडिया आणि मोबाईलने मुलांचे जीवन विचलित केले आहे, त्यामुळे आपण अत्यंत सतर्क राहून मुलांच्या शिक्षण आणि संस्कारांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
तन्वीर मनियार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, दर्जेदार शिक्षण आपल्या आयुष्यात क्रांती घडवू शकते, जर पालकांनी आपल्या मुलांना योग्य वेळ दिला तर. “आपल्या मुलांसाठी मोठी स्वप्ने पाहा त्यांना दररोज वेळ द्या, सकाळी ७ मिनिटे, दुपारी किंवा शाळेतून आल्यावर ७ मिनिटे आणि रात्री झोपण्यापूर्वी ७ मिनिटे. अशा प्रकारे सर्व पालकांनी आपल्या मुलांना दररोज २१ मिनिटे दिली तर मुले अधिक आत्मविश्वासी आणि जबाबदार बनून आपले शैक्षणिक ध्येय साध्य करतील. त्यांनी अतिशय सोप्या उदाहरणांद्वारे पालकांना मार्गदर्शन केले आणि हकीम लुकमान यांनी आपल्या मुलाला दिलेला मोलाचा सल्ला अत्यंत सुंदर शब्दांत सांगितला. सभेदरम्यान पालकांनी तन्वीर मनियार यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष जमीर शेख यांनी सर्व भाषणांचा आढावा घेत आपली भूमिका मांडली आणि शाळा अधिक दर्जेदार बनवण्यासाठी दिलेल्या सूचनेवर एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी शिक्षकांच्या कष्टाचेही विशेष कौतुक केले. पुढे सांगितले की, शैक्षणिक क्षेत्रात किंवा कुठेही कोणतीही चुकीची गोष्ट किंवा अन्याय निदर्शनास आल्यास, त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. आपण अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध नेहमी सत्याची साथ देऊ आणि न्यायासाठी प्रयत्न करू. मोईज सिराज अहमद यांनी सूत्रसंचालन केले तर इरफान पटेल यांनी आभार मानले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















