वेळापूर – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून वेळापूर पोलीस स्टेशनच्या वतीने हद्दीतील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी उपस्थित पत्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन पारंपरिक पद्धतीने फेटा बांधून वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पत्रकार बांधव तसेच वेळापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी म्हणाले, “मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्या विचारांचा वारसा आजचे पत्रकार पुढे नेत असून समाजातील सामान्य नागरिकांच्या समस्या, अन्याय व अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “पत्रकार आणि पोलीस प्रशासन हे समाजव्यवस्थेचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करतात, तर पत्रकार समाजातील वास्तव लोकांसमोर मांडतात. दोघांचेही अंतिम उद्दिष्ट समाजात शांतता, सुरक्षितता आणि पारदर्शकता निर्माण करणे हेच आहे.”
“पत्रकारांकडून मिळणारी वस्तुनिष्ठ व सकारात्मक माहिती पोलीस प्रशासनाला योग्य निर्णय घेण्यास उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनही पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत व त्यांच्या कार्याबाबत सदैव संवेदनशील आहे. परस्पर विश्वास, संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातूनच समाजहिताचे मोठे उद्दिष्ट साध्य होऊ शकते,” असेही त्यांनी नमूद केले.
शेवटी पत्रकारांना शुभेच्छा देताना त्यांनी सांगितले की, “लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांनी सत्याची कास धरून, सामाजिक बांधिलकी जपत निर्भीडपणे आपले कार्य सुरू ठेवावे. असे शेवटी आवाहन केले.तसेच यावेळी पञकार सुर्यकांत भिसे, रामचंद्र मगर, यांनीही विचार व्यक्त केले.


















