माढा : आर्या कृषी महाविद्यालय मानेगाव येथे राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. नितीन उबाळे होते प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. कविता देशमुख, सहाय्यक प्राध्यापक, विस्तार शिक्षण विभाग, श्रीराम कृषी महाविद्यालय, पानीव उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुण्या डॉ. देशमुख यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात राजमाता जिजाऊसाहेब यांच्या संस्कारातून घडलेले नेतृत्व आणि स्वामी विवेकानंदांचे युवकांवरील विश्वास अधोरेखित केले. “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका,” हा स्वामी विवेकानंदांचा विचार युवकांसाठी आजही मार्गदर्शक असून आत्मशिस्त, आत्मविश्वास व सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातूनच राष्ट्रनिर्मिती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंदांनी मांडलेले बंधुत्व, समता व मानवतेचे मूल्य समाजात सौहार्द निर्माण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. नितीन उबाळे यांनी युवकांनी राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षणासोबत चारित्र्यनिर्मिती व राष्ट्रसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. धनंजय कुलकर्णी व प्रा. खंडेराव वाघे होते. प्रा. संदीप मुरुमकर, प्रा. तुषार नामदे, डॉ. संदीप मखमले, प्रा. स्नेहल साठे, प्रा. ज्ञानेश्वरी झोळ, डॉ. तृप्ती राठोड, प्रा. अक्षय शेळके, प्रा. हनुमंत निगुडे तसेच कुमार शिंदे व रोहित घळके यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


















