बार्शी – बार्शीच्या शैक्षणिक व वैद्यकीय परंपरेला उजाळा देणारी कामगिरी करत येथील सुपुत्र डॉ. शुभम विश्वनाथ थळपती यांनी एम.एस. (मास्टर इन जनरल सर्जरी) ही पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बार्शी शहरासह वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. शुभम थळपती यांचे प्राथमिक शिक्षण सोजर इंग्लिश स्कूल, बार्शी आणि संजीवनी पब्लिक स्कूल, पन्हाळा येथे झाले. त्यानंतर त्यांनी मॉडेल स्कूल, सोलापूर येथून अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. गुणवत्तेच्या बळावर त्यांना वैशंपायन मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे प्रवेश मिळाला असून तेथून त्यांनी एमबीबीएस ही पदवी संपादन केली.
कोरोना महामारीच्या कठीण काळात डॉ. शुभम थळपती यांनी बार्शी शहरात रुग्णसेवेसाठी स्वतःला झोकून देत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी वेदांत इन्स्टिट्यूट, पालघर येथे प्रवेश घेऊन एम.एस. (जनरल सर्जरी) ही पदव्युत्तर पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली.
या यशामुळे बार्शीच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक कुशल, आधुनिक शल्यचिकित्सक उपलब्ध झाला असून त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.




















