मंद्रूप –“श्री मळसिध्दप्पा महाराज की जय”च्या जयघोषात मळसिध्दप्पा यात्रेतील अक्षता सोहळा मंगळवारी सायंकाळी सव्वा आठ वाजता शेकडो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.
या सोहळ्याची सुरुवात पुजारी गल्ली येथे मानाच्या चारही नंदीध्वजांच्या पूजनाने झाली. यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲड. राजेश देशमुख आणि हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर नंदीध्वज सवाद्य मिरवणुकीने मुख्य मार्गावरून मळसिध्दप्पा मंदिराकडे मार्गस्थ झाले.
सायंकाळी आठ वाजता नंदीध्वजांचे संमती कट्ट्याजवळ आगमन झाले. येथे पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी श्री मळसिध्दप्पा महाराज तसेच नंदीध्वजांचे दर्शन घेत भाविकांनी सहभाग नोंदविला.
अक्षता सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

















