टेंभुर्णी – 5 जानेवारी ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत भोपाळ येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) मार्फत घेण्यात आलेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धा मध्ये गौरी आनंदराव ढवळे हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना 19 वर्षाखालील मुलींच्या गटात गोल्ड मेडल व साईप्रसाद आनंदराव ढवळे याने 14 वर्षाखालील मुलांच्या गटात सिल्वर मेडल मिळवून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गौरवशाली कामगिरी केली आहे. गौरी आणि साईप्रसाद हे दोघेही बहिण भाऊ सापटणे( टेंभुर्णी )येथील रहिवासी असून उप कृषी अधिकारी आनंदराव ढवळे यांची मुलं आहेत. ते दोघेही माननीय बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले खुर्द तालुका माढा येथे इयत्ता बारावी व इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहेत.
एमपी शूटिंग अकॅडमी भोपाळ येथे दिनांक पाच जानेवारी ते नऊ जानेवारी रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय रायफल शूटिंग क्रीडा स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून एकूण 44 संघांनी सहभाग घेतला होता व एकूण 884 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना गौरी आणि साईप्रसाद यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र संघाला गौरीने गोल्ड मेडल व साईप्रसाद याने सिल्वर मेडल मिळवून दिले आहे .इयत्ता बारावीत शिकणारी गौरी सलग तिसऱ्यांदा नॅशनल झाली असून इयत्ता सातवीत शिकणारा साईप्रसाद पहिल्याच प्रयत्नात नॅशनल झालेला आहे. गौरी व साईप्रसाद यांना या खेळातील मार्गदर्शन श्री हरिभाऊ होले सर यांनी केलेले असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या मेडिटेशन व योगा चे मार्गदर्शन श्री राजेंद्र अनवते सर यांनी केले आहे. संस्थेचे सचिव आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र ठोंबरे सर यांचा नेहमीच या खेळाडूंना भक्कम पाठिंबा राहिला आहे तसेच क्रीडाशिक्षक श्री माने सर श्री श्रीराम सर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे .गौरी आणि साईप्रसाद यांच्या नेमबाजीतील या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा .आमदार संजय (मामा) शिंदे रणजीत (भैय्या) शिंदे यांनी कौतुक केले असून खेळातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

















