सोलापूर – श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये आयईडीएसएसए अंतर्गत विभाग ‘C’ साठी सोलापूर जिल्ह्याच्या मुला-मुलींची बुद्धिबळ व कॅरम विभागीय स्पर्धा दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित रंगतदार सामने सादर केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गव्हर्निंग बॉडीचे माननीय सदस्य श्री. ॲड. आर. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी क्रीडा संस्कार, शिस्त आणि निरोगी स्पर्धात्मकतेचे महत्त्व सांगितले. यावेळी गव्हर्निंग बॉडी सदस्य श्री. श्रेयस आळंद उपस्थित होते. श्री. प्रमोद शिवगुंडे यांनी जोपर्यंत स्पर्धा जिंकत नाही तोपर्यंत हार होत नाही असे सांगून स्पर्धकांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी अगरखेड यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सोलापूर जिल्हा बुद्धिबळ व कॅरम असोसिएशन यांनी नियोजन, तांत्रिक मार्गदर्शन आणि नियमावली यांची जबाबदारी प्रभावीरीत्या पार पाडली. त्यांच्या सहकार्यामुळे सामने वेळेवर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. क्रीडा विभागाने संपूर्ण समन्वय उत्तमरित्या सांभाळला. बुद्धिबळ स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तर्कशक्ती, रणनीती आणि शांत संयमाचे उत्तम प्रदर्शन केले. कॅरम स्पर्धेत अचूकता, कौशल्य आणि जलद प्रतिक्रिया यांमुळे अनेक सामने विशेष थरारक झाले. क्रिडा प्रमुख प्रा. स्वयंप्रकाश व्यास यांनी कार्यक्रमाच्या वेळापत्रकाचे नियोजन केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कॉलेजच्या मॅनेजमेंटचे पूर्णपणे सहकार्य लाभले. आवश्यक सुविधा, प्रोत्साहन आणि आयोजनासाठी दिलेल्या मदतीमुळे कार्यक्रम सुरळीत व प्रभावीपणे पार पडला.
बुद्धिबळ मुलींच्या गटात पहिला क्रमांक श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक यांनी पटकावला तर दुसरा क्रमांक शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर यांना मिळाला. मुलांच्या गटात पहिला क्रमांक शासकीय तंत्रनिकेतन सोलापूर यांच्या नावे तर दुसरा क्रमांक फॅबटेक कॉलेज सांगोला यांनी मिळवला. कॅरम स्पर्धेत मुलींच्या गटात पहिला क्रमांक न्यू सातारा पॉलिटेक्निक, पंढरपूर आणि दुसरा क्रमांक एस. पी. एम पॉलिटेक्निक सोलापूर यांना मिळाला. मुलांच्या गटात पहिल्या क्रमांकाचा बहुमान एस. पी. एम पॉलिटेक्निक सोलापूर यांनी तर दुसऱ्या क्रमांकाचा मान स्वेरी पॉलिटेक्निक पंढरपूर यांनी मिळवला. विजयी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट खेळभावना, शिस्त आणि आत्मविश्वास दाखविल्याबद्दल देखील प्रशंसा करण्यात आली. सर्व विजेत्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री धर्मराज काडादी यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी कॉलेजचे क्रीडा प्रमुख प्रा. स्वयंप्रकाश व्यास यांनी उपस्थित मान्यवर, सोलापूर जिल्हा बुद्धिबळ व कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी, सहभागी विद्यार्थी, आयोजक मंडळ आणि सहाय्यक शिक्षक यांचे मनःपूर्वक आभार मानले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. गजानन धरणे यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. त्यांच्या प्रेरणादायी पाठबळामुळे संपूर्ण आयोजन अधिक प्रभावी आणि सुव्यवस्थित पार पडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. शीतल सावळगी , प्रा. संग्राम माने, प्रा. रविकिरण पतंगे, प्रा. वैदेही देशपांडे, ऐश्वर्या व्हनमाने तसेच क्रिडा विद्यार्थी प्रतिनिधींनी यांनी परिश्रम घेतले.


















