करकंब : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने शिक्षक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने तालुका जिल्हा विभागीय आणि राज्यस्तरावर विविध प्रकारच्या ४२ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये वाद्य वादन (पखवाज) स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली तालुका पंढरपूर व करकंब गावचे सुपुत्र आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.त्यामध्ये महाराष्ट्रातून एकूण ४० स्पर्धक सहभागी झाले होते.
ज्ञानेश्वर दुधाणे यांनी महाराष्ट्र राज्य स्तरीय पखवाज वादन स्पर्धेत पखवाजवादन करत प्रथम क्रमांक पटकावला.याबद्दल त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवीण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.त्यांना त्रिगुण पुजारी यांनी सुंदर लेहला साथ केली.ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून करकंब येथे पर्यावरण रक्षणासाठी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या माध्यमातून १००० वृक्षांचे संगोपन करत आहेत.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी एकलव्य अभ्यासिका सुरू आहे.भारतभर मोठमोठ्या संगीत महोत्सवामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी व इतर सर्व प्रसिद्ध कलाकारांना पखवाज साथसंगत केली आहे.शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम करत असून शाळेतही दर्जेदार शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.
या राज्यस्तरीय यशाबद्दल त्यांचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे,केंद्रप्रमुख पा.वा.जाधव,तसेच शिक्षक,शिक्षिका शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

























