सोलापूर, – इच्छुकांकडून सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून जिल्हा परिषदेसाठी ३ तर पंचायत समितीसाठी ४ जणांनी उमेदवारी दाखल केला आहे.
यामध्ये बोरामणी गटासाठी धनेश अचलारे शिवसेना, हत्तूर गटासाठी उज्ज्वला अनिल हवीनाळे भाजपा, भंडारकवठे गटासाठी रुपादेवी अमसिद्ध कमळे कॉंग्रेस यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर बोरामणी गणासाठी सारिका पाटील भाजपा, कुंभारी गणासाठी अशोक करजोळे भाजपा, औराद गणासाठी संदीप टेळे भाजपा, निंबर्गी गणासाठी सुषमा दुपारगुड़े भाजपा यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण जमदाडे यांनी सांगितले.
१६ जानेवारीपासून दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. दक्षिणमध्ये ४६८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेला आहे. तर सोमवारी भाजपा ५, शिवसेना शिंदे गट १ तर काॅंग्रेसकडून १ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बुधवारी २१ जानेवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून त्यावेळी इच्छुकांची गर्दी दिसून येणार आहे.
नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका होत असल्याने प्रत्येक पक्षाकडून इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी टाळण्यासाठी अद्याप कोणत्याच पक्षाने उमेदवारी जाहीर केली नाही. मात्र इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज घेणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून चार दिवसात ४६८ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे.
शुक्रवार १६ जानेवारी रोजी १९५, शनिवार १७ जानेवारी रोजी ११० तर सोमवार १९ रोजी १६३ अर्जांची विक्री झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
….
भाजपाकडून एबी फाॅर्म नाही
….
भाजपाकडून उमेदवारी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आली आहे. मात्र जागा वाटप न झाल्याने इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून एबी फाॅर्म देण्यात आले नाही. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयात एबी फाॅर्म देण्यात येणार असल्याचे एका इच्छुकांनी सांगितले. त्यामुळे इच्छुकांमध्ये कोणाची लाॅटरी लागणार? याकडे लक्ष लागले आहे.

























