सांगोला – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अंतर्गत इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये खो-खो व कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. खो-खो स्पर्धेसाठी १४ तर कबड्डीसाठी १८ संघांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. कबड्डी मध्ये न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक) कोर्टी, पंढरपूर व खो-खो मध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) शेळवे, पंढरपूर हे संघ विजेते ठरले. विजयी संघांना संस्थेचे विश्वस्त डॉ.यशोदीप गायकवाड यांच्या हस्ते चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कबड्डीसाठी पंचप्रमुख म्हणून सुनील भोरे तर पंच म्हणून धनराज जाधव, बजरंग गायकवाड, मिथुन वडजे, अक्षय वाघमोडे, योगेश माने, नितीन गुंजे, वेदांत गायकवाड, राहुल इंगोले, अभिषेक शिवशरण तसेच खो-खोसाठी पंचप्रमुख म्हणून धोंडीराम पाटील तर पंच म्हणून प्रल्हाद जाधव, शाहनवाज मुजावर, शंकर मेटकरी, सुजित मेटकरी, प्रथमेश जाधव यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजचे प्राचार्य डॉ.रणजित देशमुख, क्रीडा समन्वयक महेंद्र दौंड, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.



















