सोलापूर : प्रसिद्ध चित्रकार प्रवीण रणदिवे आणि शिल्पकार महेश हलशेट्टी यांच्या कलाकृतींचे संयुक्त कला प्रदर्शन मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 20 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत भरवले जाणार आहे.
या प्रदर्शनात प्रवीण रणदिवे यांची 20 चित्रे तर महेश हलशेट्टी यांची 14 शिल्पे मांडण्यात येणार आहेत. प्रवीण रणदिवे यांनी त्यांच्या खास मोजॅक शैलीत व मिश्र माध्यमातून सोलापुरी चादर, बिबट्या, निसर्ग व मनुष्य यांचे नाते, तसेच पाण्यातील जीवन अशा विविध विषयांवर चित्रनिर्मिती केली आहे. नेहरू सेंटर आर्ट गॅलरीतील हे त्यांचे दुसरे प्रदर्शन असून यापूर्वी मुंबई, पुणे, बंगळुरू व अहमदाबाद येथेही त्यांच्या चित्रप्रदर्शनांचे आयोजन झाले आहे.
शिल्पकार महेश हलशेट्टी यांनी दगड, लाकूड, धातू व फायबर अशा विविध माध्यमांतून साकारलेली शिल्पे सादर केली असून, त्यांचे विषय मानवी दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारित आहेत. हे कला प्रदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असून, कला रसिकांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.



















