सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजचे सन २०२६-२७ हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत सांगोला तालुका शहर व तालुका बास्केटबॉल असोसिएशन संलग्न संभाजी कदम बास्केटबॉल स्पोर्ट्स अकॅडमीचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रशिक्षक संभाजी कदम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके, चंद्रशेखर अंकलगी, संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी पुणेचे संचालक व प्रशिक्षक शरद नागणे, गणेश नागणे, सागर कदम, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास होनराव, सचिव प्रशांत मस्के, प्राचार्य अमोल गायकवाड उपस्थित होते.
मनोगतात भारतीय सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत असलेले संभाजी कदम यांनी सांगोल्यातील ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे आणि कौशल्य प्राप्त व्हावे व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची उत्तुंग कामगिरी व्हावी या उद्देशाने ही अकॅडमी स्थापन केल्याचे सांगत यासाठी प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी संस्थेचा व १९८२ पासून अखंड सुरू असलेल्या बास्केटबॉल स्पर्धेचा इतिहास उलगडून सांगत ग्रामीण भागात बास्केटबॉल खेळ रुजवण्याचे कार्य केले आहे असे सांगितले. याप्रसंगी क्रीडाप्रेमी, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अमोल गायकवाड, सूत्रसंचलन प्रा.धनाजी चव्हाण, सुनील मोरे यांनी केले. आभार प्रशांत मस्के यांनी मानले.


















