बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, पर्यावरण संवर्धनविषयक कामगिरी देखील अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन पुअहो विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पुअहो अध्यासन आणि श्री शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव होते.
यावेळी जेष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी, पुअहो अध्यसनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. मुरहरी केळे, प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, इतिहास विभाग प्रमुख डॉ. विष्णू वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे कुलगुरु म्हणाले की, समाज बदल घडविण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी लागते. आम्ही विद्यापीठ परिसरात नव्याने दोन लाख वृक्षांची लागवड केली आहे. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून मनापासून वनीकरणात सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
बीजभाषक जेष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्य कारभाराची हजारो कागदपत्रे सरकारने खुली केली आहेत. नव संशोधकांनी कागदपत्राच्या आधारे अहिल्यादेवींचे दुर्लक्षित राहिलेले कार्य समाजापुढे ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. यादव यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपले जीवन अर्थपूर्ण जगावे. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाप्रमाणे सोलापूर विद्यापीठातही नव संशोधक निर्माण व्हावेत असे त्यांनी मत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी, सूत्रसंचालन डॉ. रविकांत शिंदे यांनी तर आभार डॉ. सोमनाथ यादव यांनी मानले.

















