किनवट : तालुक्यातील बोधडी येथील रहिवासी मारोती रामा बोईनवाड (वय ३३) यांचा धावत्या रेल्वेतून पडून झालेल्या अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.१० वाजण्याच्या सुमारास मारोती बोईनवाड हे किनवट ते तिरुपती कृष्णा एक्सप्रेस या रेल गाडीने प्रवास करीत होते. याच दरम्यान बोधडी रेल्वे स्टेशन परिसरात ते धावत्या गाडीतून अचानक खाली पडल्याने गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील सर जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार सुरू असताना आज दि. २९ जानेवारी २०२६ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बोईनवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी नोंद घेतली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

























