सोलापूर – हरिपाठ परिवाराचा तृतीय वर्धापन दिन सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोफत मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते माननीय ज्ञानेश्वर आप्पा सपाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
हरिपाठ परिवाराच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये महिला भजनी मंडळांना मो फत वारकरी पाऊल प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू असून तिसऱ्या वर्षात पदार्पण करताना बळीराम जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत नगर, तुकाराम महाराज मंदिर अशोक चौक, संत गोरोबाकाका मंदिर लष्कर, महादेव मंदिर लष्कर, टाकळीकर मंगल कार्यालय हनुमान मंदिर, बाळे डुमणे नगर, माऊली मंदिर अवंती नगर आणि निराळे वस्ती मुख्य शाखा अशा दहा शाखांमधील सुमारे २०० महिलांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी तिळगुळ वाटप व हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना हरिभक्तिपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी वारकरी संप्रदायातील हरिपाठाचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. तर सी. ए. राजगोपाल मनियार यांनी अयोध्या व श्रीराम मंदिराचे महात्म्य भाविकांना समजावून सांगितले.
संत सावता माळी वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व संगीत विद्यालयाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी ३० नागरिकांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली असून मोफत शस्त्रक्रियेसाठी शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय, बाळे यांचे सहकार्य लाभणार आहे.
यावेळी कार्यक्रमात विजया हुंबे, ललिता टाकळीकर, श्रद्धा जाधव, अश्विनी जांभळे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत जांभळे, अविराज जांभळे, अंजली लोखंडे व तुकाराम लोखंडे यांनी परिश्रम घेतले.

























