सांगोला – आपुलकी प्रतिष्ठान व कोर्ट रिसिव्हर अंबिकादेवी यात्रा समिती, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने झोपडपट्टीतील मुले व त्यांच्या कुटुंबियांना यात्रेचा आनंद द्विगुणित करणाऱ्या पाळण्याचा आनंद देऊन नंतर खाऊ देवून यात्रेची सफर घडविण्यात आली.
पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर भटकंती करुन मिळेल त्यात समाधान मानणारी ही भटकी कुटुंबे आपल्या प्रपंचाचा गाडा ओढताना होणारी दमछाक कोणाला सांगणार ? अशा परिस्थितीत यात्रेचा आनंद मुलांना मिळणे तसे दुर्मिळच. याचा विचार करुनच आपुलकी प्रतिष्ठान या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने गेल्या वर्षीपासून अशा मुलांना सांगोला यात्रेची सफर घडवून आणण्याचा एक आनंददायी उपक्रम सुरु केला आहे.
यावर्षी कोर्ट रिसिव्हर ॲड.सारंग वांगीकर, ॲड.विक्रांत बनकर, ॲड.विशालदीप बाबर, ॲड.नितीन बाबर, ॲड.शशिकला खाडे, ॲड.महेंद्र पतकी व पाळण्याचे मालक प्रदीप इंगोले (वाढेगाव) यांच्या सहकार्याने लक्ष्मीनगर झोपडपट्टीतील मुलांना यात्रा दर्शन घडविण्यात आले. यावेळी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, वसंत माने, महादेव दिवटे, अरविंद डोंबे, अतुल वाघमोडे उपस्थित होते.

























