सोलापूर – पोलीस असल्याची बतावणी करणारा अंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली असून ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांची लूट करणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराला फौजदार चावडी पोलिसांनी अटक केली आहे. जाफर शहाजमान इराणी राहणार लोणी काळभोर, पुणे असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 35 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरात घडलेले चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
23 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर-पुणे हायवेवरील नागोबा मंदिराजवळ जाफरने आणि त्याच्या साथीदाराने दुपारच्या सुमारास एका व्यक्तीला अडवून आम्ही पोलीस असल्याचे भासवले. हातचलाखीने त्यांच्याकडील 35 ग्रॅमचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
जाफर हा पुण्यातून तडीपार आहे. परळी वैजनाथ येथे लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस पोहोचण्यापूर्वीच तो पळाला. त्यानंतर लोणी काळभोर, जेजुरी, सातारा, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी वास्तव्य बदलले. फौजदार चावडी पोलिसांचे डी.बी. पथकाने वेषांतर करून सलग तीन दिवस आणि रात्री त्याचा पाठलाग केला. 1200 किलोमीटरचा प्रवास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथून पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले. जाफरवर यापूर्वी फसवणूक, घरफोडी, चेन स्नॅचिंगसारखे 18 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही अटक महामार्गावरील गुन्ह्यांना लगाम घालण्यात महत्त्वाची ठरली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ प्रताप पोमण व.पो.नि. महादेव राउत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांचे मागदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पथक प्रमूख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर पोहवा/प्रविण चुंगे पोहवा/सचिन बाबर, पोहवा/परिट, पोना/शिवानंद भिमदे, पोकों/विनोद पुजारी, पोकों/कृष्णा बडुरे, पोकों/दिनोद व्हटकर, पोकों/अजय चव्हाण, पोकों/आतीश पाटील, पोकों/ज्ञानेश्वर गायकवाड, पोको शशीकांत दराडे, पोकों अमोल खरटमल, पोकों/सुरज सोनवलकर, पोकॉ सुधाकर माने, पोकों/नितीन मोरे, पोकों/ पंकज घाडगे, पोहवा/अयाज बागलकोटे, पोहवा/प्रकाश गायकवाड, पोहवा/मच्छींद्र राठोड, पोकों/तौसीफ शेख यांनी केली आहे.


























