मंगळवेढा – पाठखळ येथे प्रेम प्रकरण लपविण्यासाठी एका वृध्द महिलेचा गळा आवळून खून करुन कडब्याच्या गंजीत जाळण्याची घटना घडली. या घटनेचा तपास कौशल्यपुर्ण लावल्याने मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांचा नुकताच दि.26 रोजी प्रजासत्ताक दिनी सोलापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक,शाल,श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
पाठखळ येथे विवाहित भावजय व अविवाहित दीर यांच्यामध्ये प्रेम संंबंध होते. हे प्रेम संबंध कोणालाही माहित होवू नये यासाठी चक्क गोपाळपूर मधील एका वृध्द महिलेस तुझ्या मुलाला शोधून देतो अशा भूलथापा मारुन पाठखळ येथे आणून तिचा गळा आवळून खून केला व तिला कडब्याच्या गंजीत पेटवून दिले. तसेच प्रियसीने आत्महत्या केल्याचा प्रियकराने बनाव केला. ही घटना संपूर्ण राज्यभर गाजली. सुुरुवातीला प्रियसीच्या वडिलाने तिने आत्महत्या केल्याची पोलीसात तक्रार दाखल केली.
मात्र पोलीसांनी सुतावरुन स्वर्ग गाठत या गुन्ह्याचे सत्य उघड केल्यानंतर सगळ्यांनीच कपाळाला हात लावले. जे तपासात उघड झाले ती घटना ऐकून संपूर्ण जिल्ह्यातील तमाम नागरिक थक्क झाले होते. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट देवून तपासाची चक्रे वेगाने फिरविल्यानंतर प्रियकर व प्रियसी या दोघांच्याही हातात बेड्या ठोकल्या गेल्या. माणसाची मने सुन्न करणारी घटना चोवीस तासाच्या आत उघड करुन रातोरात प्रियसी आरोपीला कराडवरुन पोलीसांनी ताब्यात घेवून मंगळवेड्यात हजर केल्यानंतर ती पोपटासारखी बोलू लागली व सर्व या घटनेचा इतिहास समोर आला.
दि.26 जानेवारी रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या घटनेचा तपास कौशल्यपुर्ण तात्काळ लावून आरोपीला गजाआड केल्याने पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे,पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,पोलीस आयुक्त एम.राजेशकुमार आदी उपस्थित होते. पो.नि.बोरीगिड्डे हे शिरोळ पोलीस स्टेशनला असताना त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. ते मुळचे कवठेमहांकाळचे असून सन 2005 मध्ये ते पोलीस खात्यात हजर झाले असून आत्तापयर्ंंत 20 वर्षे त्यांची सेवा झाली आहे.
मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सन्मानपत्र देवून सत्कार करताना सोबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,पोलीस आयुक्त एम.राजेशकुमार आदी छायाचित्रात दिसत आहेत. (छाया- प्रथमेशरा जे,मंगळवेढा)



























