सोलापूर – येथील ज्येष्ठ कवी सूर्यकांत घिवारे लिखित ‘शब्द परिमल’ या दुसऱ्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता जुळे सोलापुरातील कोणार्क नगर येथील दिपाली मल्टिपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे अध्यक्षपद महाराष्ट्र साहित्य परिषद पश्चिम सोलापूर शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे भूषवणार आहेत. मसाप पुणे पश्चिम सोलापूर शाखेच्या उपाध्यक्षा शोभा मोरे यांच्या शुभहस्ते या कवितासंग्रहाचे प्रकाशन होईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कवयित्री व समीक्षक डॉ. कविता मुरुमकर उपस्थित राहणार असून, प्रमुख वक्ते म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मसाप पुणे सोलापूरचे जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी आणि शिवप्रज्ञा प्रकाशनाचे राजेंद्र भोसले यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कवी सूर्यकांत घिवारे हे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्यांचा यापूर्वी ‘मृद्गंध’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘शब्द परिमल’ या त्यांच्या दुसऱ्या संग्रहात सामाजिक, कौटुंबिक, निसर्ग आणि धार्मिक अशा विविध विषयांवरील कवितांचा समावेश आहे. या संग्रहास ज्येष्ठ साहित्यिक वंदना कुलकर्णी यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रकाशन सोहळ्यास सोलापूरच्या साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उमेश भिंगरे, दिग्विजय भुंरे आणि शिवप्रज्ञा प्रकाशनाच्या राजश्री राजेंद्र भोसले यांनी केले आहे.



























