सोलापूर – मध्यवर्ती बस स्थानकातून हिंगोलीकडे रात्री ९ वाजता सुटणारी राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) महत्त्वाची बस गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने रद्द होत असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता बस रद्द केल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सोलापूर–हिंगोली ही बस मराठवाड्यातील अनेक प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः नोकरी, शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या या बसला मोठी असते. मात्र सलग तीन दिवस बस रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना रात्रभर बस स्थानकात थांबावे लागले, तर काहींना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसे दोन्ही वाया गेले.
बस रद्द झाल्याची माहिती वेळेत न दिल्यामुळे प्रवाशांचा संताप अधिक वाढला आहे. “तिकीट काढल्यानंतर बस रद्द झाल्याचे सांगितले जाते. पर्यायी बसची कोणतीही व्यवस्था नसते,” अशी तक्रार प्रवाशांनी केली. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांकडून कधी वाहनांची कमतरता, तर कधी चालक उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र सलग तीन दिवस एकाच बसचे रद्द होणे ही गंभीर बाब असून एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.प्रवाशांनी एसटी महामंडळाने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन नियमित बससेवा सुरू करावी, तसेच बस रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था व पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा प्रवाशांचा एसटीवरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

























