सोलापूर : आसरा चौक परिसरातील एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीत अतिसाराच्या घटनेनंतर परिस्थिती अधिक गंभीर बनली असून बाधितांपैकी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाली आहे. संबंधित रुग्णाला बुधवारी यशोधरा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोलापूर महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची तपासणी सुरू केली असून काल आणि आज पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
एसबी प्लाझा आयकॉन या इमारतीतील सुमारे ४० रहिवाशांना अतिसाराची लागण झाली असून विविध खासगी रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी आयेशा शेख (वय ४६) यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्याने त्यांना यशोधरा हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी दूषित मलवाहिनी तातडीने बदलण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली.
दरम्यान, या संदर्भात महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितले की, संबंधित झोन कार्यालयामार्फत ड्रेनेज लाईनची सविस्तर तपासणी सुरू आहे. ड्रेनेजचे पाणी बोअरमध्ये मिसळत असल्याची रहिवाशांची शंका पडताळून पाहिली जात असून ड्रेनेज लाईनची स्वच्छताही करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दूषित पाण्यामुळेच संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त होत असताना रहिवाशांनी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली आहे. परिसरातील ड्रेनेज व्यवस्था निकृष्ट असल्याने भविष्यातही अशा घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आमच्या इमारतीमध्ये तीन बोअर आहेत. त्यातील दोन बोअरमधून हा संसर्ग झाला असावा अशी शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्हाला एक देण्याचे आउटलेट काढून देत आहेत. किल्लेदार मंगल कार्यालय ते इनामदार मार्ग येथे ड्रेनेजची मेन लाईनच नाही. आता नव्याने करण्यात येणाऱ्या चेंबरसाठीही आम्ही रहिवाशांनी पैसे द्यावेत, अशी मागणी महापालिकेकडून होत आहे, असे रहिवासी आणि रुग्णाचे नातेवाईक डॉ. असिफ शेख यांनी सांगितले.
महापालिकेच्या पथकाने
तेथील सर्वेक्षण केले : डॉ. माने
संबंधित इमारतीतील पाणी हे महापालिकेचे पाणी नाही. त्या ठिकाणी खाजगी बोअर आहेत. खाजगी बोअरमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळले आहे. अशी रहिवाशांची शंका आहे. महापालिकेच्या पथकाने तेथील सर्वेक्षण केले आहे. पाण्याचे नमुनेही काल आणि आज घेऊन लॅबला पाठवले आहे, आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत आहे, असे महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले.
Post Views: 18