किनवट – येथे मंजूर झालेल्या व सध्या निर्माणाधीन असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत व नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने किनवट वकील संघाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद येंड्रलवार यांचा वकील संघाच्या वतीने सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या संदर्भात किनवट वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा सौ. सुजाता येंड्रलवार यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीभोवती रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज, पार्किंग सुविधा तसेच न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेल्या इतर नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे असल्याचे वकील संघाच्या वतीने नमूद करण्यात आले. न्यायालय सुरू झाल्यानंतर न्यायाधीश, वकील, कर्मचारी तसेच न्यायासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी नगर परिषद व प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
नगराध्यक्षा सौ. सुजाता येंड्रलवार यांनी वकील संघाच्या सूचनांचे स्वागत करत, जिल्हा व सत्र न्यायालय हे किनवट शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे शासकीय केंद्र ठरणार असल्याचे सांगितले. न्यायालय परिसरात आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषद आपल्या स्तरावरून पूर्ण सहकार्य करेल, तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या भेटीप्रसंगी युवा नेते करण येंड्रलवार, नगरसेवक अभय महाजन, शहर प्रमुख प्रशांत कोरडे यांच्यासह किनवट वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किशोर मुनेश्वर, उपाध्यक्ष ॲड. टेकसिंग चव्हाण, तसेच ॲड. अरविंद चव्हाण, ॲड. उदय चव्हाण, ॲड. आकाश कोमरवार, ॲड. पंकज गावंडे, ॲड. येऊतकर, ॲड. सम्राट सर्पे, ॲड. मिलिंद सर्पे, ॲड. दिव्या पाटील, ॲड. दीपा सोनकांबळे, ॲड. विपीन पवार, ॲड. मुसळे, ॲड. व्ही. बी. कानिंदे, ॲड. सचिन दारवंडे, ॲड. हरि दर्शनवाड आदी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली असून, आगामी काळात न्यायालयीन सुविधा आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने हे सहकार्य उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.























