पंढरपूर – असंख्य विठ्ठल भक्तांच्या सोयीसाठी भुसावळ ते पंढरपूर ही रेल्वे चालू करण्यात यावी. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल व भाविकांची सोय होणार आहे. त्यामुळे भुसावळ ते पंढरपूर ही रेल्वे चालू करण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटी पंढरपूर विधानसभा अध्यक्ष महेश अधटराव यांनी पंढरपूरचे स्टेशन प्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
या संदर्भात येथील स्थानक प्रबंधकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या पदस्पर्शाने पावन झालेले पंढरपूर हे तिर्थक्षेत्र दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाते. पंढरपूर येथे वर्षात आषाढी, कार्तिकी या दोन मोठ्या व माघी व चैत्री या दोन लहान यात्रा भरत असतात.त्याचबरोबर महिन्याच्या एकादशीला देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येत असतात. विशेष म्हणजे भुसावळ-जळगांव-पाचोरा-चाळीसगाव या भागातील पंढरपूरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. त्यांच्या सोयीसाठी भुसावळ ते पंढरपूर ही रेल्वे चालू करण्यात यावी यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल व भाविकांची सोय होणार आहे.
या बरोबरच सध्या जळगांववरून एकच ट्रेन ती दिल्ली ते बेंगलोर ही गाडी सुपरफास्ट असून याचा पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना कोणताही फायदा होत नाही. ही गाडी जळगाव वरून निघल्यानंतर ती पंढरपूरला येत नाही. मात्र कुर्डुवाडी येथे थांबत असते त्यामुळे भाविकांना तेथून दुसऱ्या खाजगी व इतर वाहनांनी पंढरपूरला यावे लागते. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी भुसावळ वरून थेट पंढरपूरसाठी विशेष रेल्वे चालू करण्यात यावी यामुळे त्या भागातून येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होईल व रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होईल असेही या निवेदना म्हटले आहे.
या निवेदनावर पंढरपूर शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संदिप शिंदे, जिल्हा सरचिटणीस पांडुरंग डांगे, कॉंग्रेस व्यापारी सेलचे आण्णा पवार, युवक शहर उपाध्यक्ष रवि अग्रवाल, संग्राम मुळे व सचिव अक्षय वनसाळे आदि कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

























