पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ गटासाठी व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या १६ गणासाठी शनिवारी (दि.७) ३०९ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. या निवडणूकीत एक लाख ९८ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी शासकीय धान्य गोदाम येथे सकाळी १०.०० वाजता सुरु होणार आहे. मोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ०८ गटासाठी व पंचायत समितीच्या १६ गणासाठी ६९.४४ टक्के इतके मतदान झाले असून, निवडणूकीत एक लाख ५ हजार ६५७ पुरुष तर ९२ हजार ८१० स्त्री अशा एकूण एक लाख ९८ हजार ४६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच आतापर्यंत ६६३ टपाली मतदान झाले आहे. मतमोजणी १६ टेबल होणार असून दोन राखीव टेबल ठेवण्यात आले आहे. तर टपाली मतमोजणी गटासाठी एक टेबल व गणासाठी दोन अशा एकूण तीन टेबलवर होणार आहे. मतमोजणी प्रक्रीयेसाठी १२० अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आले असून प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल अशा सूचनाही निवडणूक निर्णय अधिकारी श्री. इथापे यांनी दिल्या.
प्रत्येक टेबलवरील मतमोजणी व्हिडीओ चित्रीकरण करण्यासाठी सी.सी. टिव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून, मतमोजणी केंद्रात व्हिडीओ चित्रीकरण करणारे फिरते पथकेही कार्यरत राहणार आहेत. मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे सोमवार दि. ०९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होणार आहे. मतमोजणी व्यवस्था, निकाल संकलनासाठी आवश्यक व्यवस्था, स्ट्रॉगरुमवर देखरेख, संकलन आदीबाबतचे निवडणुक नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.






















