पंढरपूर – श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील महावस्त्र विभागातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व पारदर्शकतेमुळे भाविकांमध्ये समाधान व विश्वासाची भावना अधिक दृढ झाली असून ही घटना समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील भाविक श्री. आशिष भिमनवार हे दिनांक ६ फेब्रुवारी रोजी पत्नी डॉ. रुपाली भिमनवार यांच्यासह श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. दर्शनानंतर त्यांनी महावस्त्र दालनास भेट देऊन माता रुक्मिणीची साडी व पांडुरंग पूजेचे वस्त्र आशीर्वाद म्हणून खरेदी केले. बिलानुसार संपूर्ण रक्कम अदा करून ते परतले.
मात्र, तीन दिवसांनंतर महावस्त्र विभागातील कर्मचाऱ्यांनी स्वतःहून भाविकांशी संपर्क साधत खरेदीदरम्यान चुकून रुपये दहा हजार जास्त रक्कम जमा झाल्याची माहिती दिली. संबंधित कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे अवघ्या दहा मिनिटांत ही रक्कम भाविकांना परत करण्यात आली.
आजच्या काळात सरकारी संस्थांमध्येही अशी प्रामाणिकता, सचोटी व निस्वार्थ सेवाभाव पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केले असून, मंदिर समिती प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणात महावस्त्र विभागातील श्रीमती मनीषाताई जायकर यांनी दाखवलेली जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा व प्रामाणिकपणा विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्यामुळे मंदिर संस्थेची विश्वासार्हता अधिक दृढ झाली असून इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.
भाविक आशिष भिमनवार यांनी या कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात यावा, तसेच शक्य असल्यास छोटेखानी सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने रोख पारितोषिक देण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली असून, त्यांनी तसा मंदिर समितीला ई-मेल देखील केला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील महावस्त्र विभागातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही प्रामाणिक सेवा नक्कीच समाजासाठी आदर्शवत असून, “विठ्ठल विठ्ठल” या नामस्मरणाला अर्थ देणारी आहे.
श्रीमती मनीषा ताई जायकर व अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या (एकनाथ दर्शने, इंदू रणदिवे, स्नेहा वाडेकर, सपना सोनार, स्नेहल वाघमारे) प्रामाणिकपणाबद्दल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक संदेश भोसले व विभाग प्रमुख अतुल बक्षी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या व परिवार देवतांच्या चरणी अर्पण केलेल्या व भेट स्वरूपात आलेली महावस्त्रे भाविकांना अल्प देणगी मूल्य आकारून श्री संत तुकाराम भवन व श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे स्टॉल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येतात. या महावस्त्राची जबाबदारी विभाग प्रमुख अतुल बक्षी व सहाय्यक विभाग प्रमुख मनिषा जायकर यांच्या कडे देण्यात आली असून, या महावस्त्रास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.























