सोलापूर – आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे दि. २ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या तृतीय सब-ज्युनिअर मुली व मुलांच्या गोल शॉट बॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने नेत्रदीपक कामगिरी करत मुली व मुलांच्या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव (सोलापूर) येथील मुली व मुलांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. खेळाडूंच्या मेहनत, शिस्तबद्ध सराव व सांघिक खेळाच्या जोरावर महाराष्ट्र संघाला हे ऐतिहासिक यश मिळाले. या स्पर्धेत देशातील २३ राज्यांतील व विविध क्रीडा अकादमीतील ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट्स, केगाव (सोलापूर) चे कॅम्पस डायरेक्टर मा. संजय नवले यांनी यशस्वी खेळाडूंचा, प्रशिक्षक राजू ठाकूर तसेच पालकांचा मनःपूर्वक सत्कार करून अभिनंदन केले. खेळाडूंनी भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करावी, असे शुभेच्छापर उद्गार त्यांनी काढले.
यावेळी प्रशालेच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले तसेच सर्व शिक्षकवर्गानेही यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
या राष्ट्रीय विजयामुळे सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव यांचे सोलापूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाले असून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.






















