सोलापूर – नुकत्याच फुजिअरा (यु ए ई) येथे वर्ल्ड कराटे फेडरेशन कडून आयोजित जागतिक पंच परीक्षेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे सोलापुरचे मिहिर संगीता सुरेश जाधव हे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक दोन्ही प्रकारांमधे उत्तम गुणांकनासहित उत्तीर्ण झाले आहेत.
मिहिर हे ट्रेडिशनल व स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे सचिव आणि रुद्र अकादमी ऑफ मार्शल आर्ट्स व योग संस्थेचे प्रमुख प्रशिक्षक असून वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी वर्ल्ड कराटे फेडरेशनची पंच परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणारे महाराष्ट्रातील लहान वयाचे पहिलेच अधिकृत पंच आहेत.
मिहिर यांनी संगमेश्वर काॅलेज मधून सायकॉलॉजी मधून ग्रॅज्युएशन केले असून पुण्यातील एम आय टी मधून मास्टर्स ऑफ योग व मेडीटेशन ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सुयश प्रशालेतून शालेय क्रीडा कराटे स्पर्धेत राष्ट्रीय पर्यंत धडक मारली असून कलरीपयत या पारंपारिक युद्धकला व क्रीडा प्रकारात सलग तीन वर्षे राष्ट्रीय सुवर्ण पदकं पटकावली असून खेलो इंडिया साठी ज्युनिअर टीम तयार करत आहेत. प्राचीन भारतासह इस्त्रायल, इंडोनेशिया, फिलिपिन्स, रशिया, तुर्क इत्यादि देशांमधील स्व संरक्षण तंत्रांचा अभ्यास करुन स्वतःचे जगभरातून भरभरुन प्रतिसाद लाभलेले सेल्फ डिफेन्स युट्यूब व इन्स्टग्राम चॅनल ते चालवतात. भारतीय कराटेच्या इतिहासात वीस वर्षांमधे पहिले आशीयाई पदक जिंकलेल्या वर्ल्ड टाॅप हंड्रेड अॅथलिट भुवनेश्वरीचे धाकटे बंधू असून 2018/19 पासून अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धा, किओ नॅशनल्स, काम स्टेट सिलेक्शन, शालेय क्रीडा स्पर्धांमधून सलग सात वर्षे पंचाची कामगिरी करण्याचा अनुभव त्यांना प्राप्त आहे.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या बाराव्या काॅमनवेल्थ व मलेशिया येथील सायलेंट नाईट ओपन इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत त्यांनी रुद्र अकादमीची ज्युनिअर टीम साठी कोचिंग करुन भारतासाठी 3 सुवर्ण, 1 रौप्य व 7 कास्य पदके पटकावून आणली आहेत.
सोलापुरात नव्या पेठेतील शिवस्मारक येथे स्पोर्ट्स कराटेचे अॅडव्हान्स तसेच बेल्ट नुसार योगाधारीत ट्रेडिशनल कराटेचे प्रशिक्षण मिहिर जाधव रोज सायंकाळी देत असून आय एम एस, एम पी एस, दमाणी प्रशाला, राज इंग्लिश मेडीयम स्कूल येथे त्यांच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षण व सराव केंद्रं सुरु आहेत.
वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या पंच परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने आता मिहिर सुरेश जाधव हे वर्ल्ड सिरीज, यूथ लीग सारख्या आंतरराष्ट्रीय गणमान्य स्पर्धांमधून पंच म्हणून उपस्थित राहतील. यास्तव कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष भरत शर्मा, महासचिव कीर्तन कोंड्रू, मार्गदर्शक अनुप देठे, जागतिक पंच शाहीन व प्रेमजीत सेन तसेच कराटे डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सलाऊदीन अन्सारी व महासचिव संदीप गाडे यांनी मिहिर यांचे अभिनंदन केले आहे.






















