सांगोला – जीवनात ध्येय गाठताना जिद्द, चिकाटी व सातत्य याबरोबर स्थिर मन आणि धाडस असेल तर मोठे ध्येय गाठता येते. तसेच ध्येय मोठी ठेवा आणि ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा असा अनमोल सल्ला ऍड.गजानन भाकरे यांनी दिला. ते सांगोला तालुक्यातील कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्यु.कॉलेजमध्ये इ.१० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ऍड.गजानन भाकरे यांच्या शुभहस्ते आणि प्राचार्य श्रीकांत लांडगे व पर्यवेक्षक चारुदत्त जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या प्रसंगी प्रणाली आलदर, सृष्टी देशमुख, गौरी देशमुख, जुनेरा तांबोळी, प्रियांका कोळेकर, तन्मय देशमुख, शंकर चौधरी या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांनी घेतलेले कष्ट व सराव यामुळे आम्हाला चांगले यश मिळवता येईल असा आशावाद व्यक्त केला. यावेळी चारुदत्त जगताप यांनी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला सामोरे कसे जावे व चांगले यश कसे प्राप्त करावे याबाबत मार्गदर्शन केले.
श्रीकांत लांडगे यांनी कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी ग्रामीण भागात शाळा सुरू केली त्यामुळे आज विद्यार्थी शिकत आहेत असे सांगत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रभुलिंग तेली, सूत्रसंचालन मारुती सरगर यांनी केले. आभार किरण ढोले यांनी मानले.




















