सोलापूर : राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार हे नव्याने स्थापन झाले आणि सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला ते आसाम मधील गुवाहाटी हे शहर. गुवाहाटी हे शहर आणखी एका बाबतीत प्रसिद्धीला आले ते म्हणजे काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओके ! या वाक्यामुळे आणि हे वाक्य होते, सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे.
राज्यातील आमदार आणि मंत्र्यांचे दौरे आता गुवाहाटीला वाढले आहेत. त्यातच आता अधिकारी सुद्धा गुवाहाटीला ट्रेनिंगसाठी जात आहेत. राज्याचे सरकार गुवाहाटीला गेल्याने स्थापन झाले त्यामुळे ट्रेनिंग केंद्र ही राज्य सरकारने बहुतेक गुवाहाटीला केले असावे अशी चर्चा आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या अतिरिक्त कारभाराचा ‘भार’ वाढला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे मसुरीला प्रशासकीय ट्रेनिंगसाठी गेल्याने त्यांचा पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर सांभाळत आहेत. सध्या मार्च इंड सुरू असल्याने निधी खर्चीसाठी कोहिनकर हे अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करत आहेत. त्यातच आता तीन महत्वाचे विभाग प्रमुख गुवाहाटीला ट्रेनिंगसाठी जात आहेत.
त्यामध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांचा समावेश आहे.
मार्चच्या पुढील आठवड्यात चार दिवसाचे ट्रेनिंग आहे. मार्च एंड असल्याने अधिकाऱ्यांची जाण्याची इच्छा नसली तरी या ट्रेनिंगचे प्रमुख डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रत्येकांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव अधिकाऱ्यांना जावं लागत आहे. मात्र गुवाहाटीचे निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी निश्चित या सर्वांना मिळणार हे मात्र नक्की.
Post Views: 138