वाळूज – मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वाळूज–साखरेवाडी या सोलापूरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या संपर्क रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. सुमारे चार किलोमीटर अंतरावरील या रस्त्यावर डांबरीकरणाचा नामोनिशानही उरलेला नाही. रस्त्याचा काही भाग पूर्णपणे उखडून गेलेला असून सर्वत्र मोठमोठे खड्डे, दगड आणि धुळीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. परिणामी दैनंदिन प्रवास नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून अपघातांचा धोका वाढला आहे.
वाळूज गावापासून साखरेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर काही ठिकाणी खडी टाकण्यात आली असली तरी त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय अधिक वाढली आहे. खडीतून मार्ग काढताना दुचाकीस्वारांना विशेषतः मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या मधोमध भलेमोठे खड्डे पडलेले असून हा मार्ग अक्षरशः खड्ड्यांच्या गर्तेत अडकल्याचे चित्र आहे.
दरवर्षीप्रमाणे ऊस वाहतुकीसाठी मोठी वाहने सुरू होताच रस्त्याची दुरवस्था अधिक प्रकर्षाने समोर येते. यंदाही त्याला अपवाद राहिलेला नाही. साखरेवाडी (ता. उ. सोलापूर हद्द) पर्यंतच्या मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक तसेच पादचारी यांची मोठी तारांबळ उडत आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे अधिकच धोकादायक ठरत आहे.
या परिसरात अंदाजे १०० ते २०० घरे असून सुमारे दोन ते अडीच हजारांची लोकवस्ती आहे. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, गरोदर महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना व आजारी रुग्णांना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकलेल्या खडीत घसरून किरकोळ जखमी झाल्याच्या घटनाही घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अनेक वेळा वाहने पंक्चर होण्याचे प्रकार वाढल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वाळूज, जाधव वस्ती आणि भागाईवाडी येथील नागरिकांसाठी तसेच शेतकरी, विद्यार्थी व कामगार वर्गासाठी हा अत्यंत महत्त्वाचा संपर्क मार्ग आहे. विशेषतः पावसाळ्यात मातीच्या रस्त्यांवर पाय ठेवणेही अवघड बनते . मात्र संबंधित लोकप्रतिनिधी आणि खात्याचे अधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. हा रस्ता प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत आरसा बनला असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ‘भिजत घोंगडे’ का ठेवण्यात आले आहे, स्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून प्रशासन पूर्णपणे झोपलेले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर ठोस दबाव टाकून नागरिक व प्रवाशांच्या अडचणींचे तातडीने निवारण करावे,संबंधित विभागाने तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे उर्वरित काम पूर्ण करावे आणि मार्ग वाहतुकीस योग्य बनवावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनधारकांकडून जोर धरत आहे.
वाळूज–साखरेवाडी हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. पण सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकी चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शाळकरी मुले, रुग्ण आणि गरोदर महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, ही आमची मागणी आहे.”
-हुसेन शेख,वाळूज
चार किलोमीटरचा महत्त्वाचा संपर्क मार्ग गेल्या अनेक वर्षापासून डांबरीकरणाविना आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांची तीव्र नाराजी आहे.दरवर्षी ऊस वाहतूक सुरू झाली की या रस्त्याची खरी परिस्थिती समोर येते. मोठ्या वाहनांमुळे खड्डे अधिक वाढले आहेत. खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते, पण त्याने त्रासच वाढतो. अनेक वेळा वाहने पंक्चर होतात, अपघात होण्याची भीती कायम असते. लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी आमची ठाम मागणी आहे.”
-आनंद डोलारे






















