सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २२ वा वर्धापन दिन अत्यंत ऐतिहासिक ठरत आहे. यंदाच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंग फॅकल्टीचे बी.टेक. पदवीचे ९ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. या भागातील शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होतो. विद्यापीठाने काळाची गरज ओळखून आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांवर विशेष भर दिला असून, हे कोर्सेस विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला आहे.
विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘तरुण भारत’शी बोलताना कुलगुरूंनी विद्यापीठाच्या आगामी विकासकामांचा आणि शैक्षणिक धोरणांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षारक्षणासह बायोटेक्नॉलॉजी, केमिकल टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी हे आठ नवीन आणि एक जुना कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी असा हा ९ अभ्यासक्रमांचा गट आहे. सोलापुरात लवकरच आयटी हब येत असून, या निर्णयामुळे सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी इतर शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. विशेषतः एआय, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटीसारख्या जागतिक मागणी असलेल्या विषयांचे शिक्षण आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. यासाठी स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्कूल ऑफ युजी अंतर्गत स्वतंत्र स्कूल डायरेक्टरची नियुक्ती केली जात आहे.
——
नवीन प्रशासकीय इमारत व पायाभूत सुविधांचे स्थलांतर
नवीन प्रशासकीय इमारतीतील मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. प्रत्यक्ष वापर केल्याशिवाय अडचणी समजणार नाहीत, या हेतूने आम्ही तेथे स्थलांतरित होत आहोत. विद्यापीठाच्या खेळाडू विद्यार्थ्यांसाठी मल्टिपर्पज हॉलचा वापर लवकरच सुरू करण्यात येणार असून, यासाठी प्रशासकीय इमारतीपासून मल्टिपर्पज हॉलपर्यंत अंतर्गत रस्ता तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. याशिवाय पीएम उषा अंतर्गत ५ इमारतींचे बांधकाम सुरू असून तेथील अंतर्गत रस्तेही लवकरच सुरू केले जातील. ज्या अभ्यासक्रमांना प्रॅक्टिकल लॅबची आवश्यकता नाही, अशा काही अभ्यासक्रमांचे वर्ग या नव्या इमारतींमध्ये लवकरात लवकर स्थलांतरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
———-
विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात बससेवा आणि ॲम्बुलन्सची सोय
विद्यापीठाकडे सध्या दोन बसेस उपलब्ध आहेत. यासाठी प्रिसिजन व बालाजी अमाईन्स या कंपन्यांचे सहकार्य लाभले. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शहरातील रंगभवन ते नवीन कॅम्पस तसेच जुन्या कॅम्पसपासून नवीन कॅम्पसपर्यंत अत्यंत अल्प शुल्कात वाहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. वर्धापन दिनापासूनच याची सुरुवात करण्यात येत असून, आणखी दोन बसेस व ॲम्बुलन्ससाठी आम्ही विविध एनजीओंकडे मागणी केली आहे.
——
एनईपीची अंमलबजावणी आणि पीजी अभ्यासक्रमांचे नियोजन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पोस्ट ग्रॅजुएशन अभ्यासक्रम हे एक वर्षाचे असणार आहेत, ज्यामुळे शिक्षकांचा वर्कलोड काहीसा कमी होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, बीएससी बरोबरच बीए आणि बीकॉम हे पदवीचे अभ्यासक्रम पुढील वर्षापासून सुरू करण्याचा आमचा मानस आहे. युजी अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतरच विद्यापीठाला आगामी काळात पीजी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी सहज उपलब्ध होऊ शकतील.
——–
वसतिगृहे, गुरुकुल पद्धती आणि ‘बालाजी उद्यम केंद्र’
विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थी कायम राहावेत यासाठी ५०० मुले आणि ५०० मुलींच्या वसतिगृहाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कॅम्पसमध्ये एक हजार ते बाराशे विद्यार्थी राहू शकतील आणि याद्वारे ‘गुरुकुल पद्धती’ची शिक्षण प्रणाली आपल्याला पुढे राबवता येईल. तसेच स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीच्या इमारतीसाठी निधी मिळण्याबाबतचा प्रस्तावही शासनाला सादर केला आहे. याशिवाय, बालाजी अमाईन्स फाऊंडेशनने २० हजार चौरस फुटांचे बांधकाम करून देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘बालाजी उद्यम केंद्र’ म्हणून अस्तित्वात येणाऱ्या या इमारतीचा उपयोग कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी केला जाईल, ज्याचा फायदा स्कूल लेव्हलचे विद्यार्थी व शिक्षकांना होईल.
——
तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र ‘सेंटर’चा मानस
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एका स्वतंत्र इमारतीची निर्मिती प्रस्तावित आहे. या सेंटरमध्ये ३० ते ३५ जणांना राहण्याची, जेवणाची आणि समुपदेशनासाठी (कौन्सिलिंग) आवश्यक ती सर्व सोय केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आम्ही एनजीओंच्या मदतीने प्रयत्न करत आहोत.
























