सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याची अवघ्या एका वर्षात तब्बल तीन वेळा प्रशासकीय बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, शासकीय सुट्टीच्या दिवशीही बदलीचे आदेश काढण्यात आल्याचा आरोप होत असून, या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक नागनाथ होटेकर यांची एका वर्षात तीन वेळा बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे. प्रथम किर्णी (ता. अक्कलकोट) येथून धामणगाव (ता. बार्शी), त्यानंतर गोयरापूर (ता. मोहोळ) आणि त्यानंतर पुन्हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे त्यांची बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी प्रत्यक्ष कार्यमुक्त न करताच पुढील बदलीचे आदेश देण्यात आल्याचीही चर्चा आहे.
यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ३१ मे २०२६ रोजी, रविवारी म्हणजेच शासकीय सुट्टीच्या दिवशी बदली आदेश काढण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण तानवडे यांनी केला आहे. यामुळे बदली प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने राबविण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, संपूर्ण बदली प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. संबंधित सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कोट
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ती भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगितले आहे.
चौकट
जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रिया पारदर्शक आहे का? एका कर्मचाऱ्याच्या वारंवार बदल्या, सुट्टीच्या दिवशी निघालेले आदेश आणि प्रशासनातील कथित संगनमत या मुद्द्यांमुळे संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या प्रकरणात चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येते का आणि जबाबदारांवर कारवाई होते का, याकडे जिल्ह्यातील कर्मचारी आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.