सोलापूर – महाराष्ट्रात ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा’ (SQAAF -स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क) अंतर्गत ‘A+’ श्रेणी प्राप्त करणाऱ्या निवडक शाळांमध्ये सोलापूर शहरातून एकमेव आणि सरस मानकरी म्हणून श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांचा गौरवशाली समावेश झाला आहे. राज्यातील हजारो शाळांमधून गुणवत्ता, शैक्षणिक उत्कृष्टता आणि व्यवस्थापनातील आदर्श पद्धती यांमुळे ही संस्था ठळकपणे पुढे आली असून, सोलापूरच्या शैक्षणिक इतिहासातील हा अभिमानास्पद टप्पा ठरला आहे. स्व. श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात लाभलेले हे यश श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळेसाठी कृतज्ञतेचे आणि शहरासाठी गौरवाचे पर्व ठरले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने राबविण्यात आली. या अंतर्गत प्रत्येक शाळेचे मूल्यांकन सहा क्षेत्रे आणि १२८ मानकांच्या आधारे करण्यात आले होते. या सर्व मानकांमध्ये उच्चस्तर प्राप्त झाल्यानंतरच ‘A+’ श्रेणी प्राप्त होते. शैक्षणिक गुणवत्ता, व्यवस्थापन कौशल्य, पायाभूत सुविधा, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वांगीण विकास या निकषांवर आधारित सखोल मूल्यमापनानंतरच ही श्रेणी बहाल करण्यात आली.
सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील लाखापेक्षा अधिक शाळांनी स्वयंमूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली. त्यापैकी गुणवत्तेच्या कठोर निकषांवर आधारित १०,७१२ शाळांची बाह्य मूल्यांकनासाठी निवड झाली. या अत्यंत काटेकोर प्रक्रियेनंतर राज्यातील केवळ ४२९ शाळांना ‘A+’ श्रेणी प्राप्त झाली. या निवडक शाळांमध्ये जैन गुरुकुलने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय यशामागे संस्थेच्या व्यवस्थापनाची दूरदृष्टी, शिक्षकवर्गाची निष्ठा आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा सुसंवाद आहे. वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष शेठ अरविंद दोशी, मानद सचिव डॉ. रणजित गांधी, विश्वस्त भूषण शहा, पृथ्वीराज गांधी, वैभव गांधी, पराग शहा तसेच समस्त विश्वस्तांनी संस्थेला सक्षम नेतृत्व दिले.
मुख्याध्यापक राजकुमार काळे म्हणाले, “आजचे यश गुरुकुल परिवाराच्या परिश्रमांची पावती आहे. हा मान आमच्यासाठी केवळ सन्मान नाही, तर अधिक जबाबदारीची जाणीवही आहे. गुणवत्तापूर्ण आणि संस्कारप्रधान शिक्षण देण्याची आमची परंपरा यापुढेही अधिक सक्षमपणे जोपासली जाईल.”
स्वर्गीय श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षात लाभलेले हे यश सोलापूरसाठी अभिमानाचे, तर गुरुकुल परिवारासाठी कृतज्ञतेचे दुर्मीळ पर्व ठरले आहे. हा महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे , बालक मंदिर विभागाच्या प्रमुख विभावरी रणदिवे आणि समस्त गुरुकुल परिवाराच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारलेली ही कामगिरी, सोलापूर शहराच्या शैक्षणिक अभिमानात भर घालणारी आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी दिशा देणारी ठरत आहे.




















