सोलापूर – “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा आपल्या सर्वांसाठी मोठा सन्मान आहे. आपली भाषा साधी, सरळ आणि लवचिक असून ती कोणालाही सहज आत्मसात करता येते. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या प्रभावी वापराद्वारे मराठी भाषेचा डंका जागतिक स्तरावर पोहोचवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा मराठी भाषा समितीच्या सचिव अंजली मरोड यांनी केले.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने, ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
अंजली मरोड पुढे म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीने महिन्यातून किमान एक तरी मराठी पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा. वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते आणि त्यातूनच एक समृद्ध समाज घडण्यास मदत होते. मराठी भाषेतील गोडवा आणि त्यातील विविध बोलीभाषांचे वैभव जपण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. श्रुती वडगबाळकर यांनी मराठी भाषेच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “मराठी ही देशातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथामुळे आणि संत साहित्याच्या संस्कारांमुळे ही भाषा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली आहे. मराठीत ४८ प्रकारचे काव्यप्रकार असून शब्दांचे सामर्थ्य या भाषेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.” मात्र, सध्या मराठी शाळांची कमी होत असलेली संख्या ही चिंतेची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजी शिंदे यांनी केले. जुने दुर्मिळ ग्रंथ आता संगणकीकरणाद्वारे जतन केले जात आहेत, ही भविष्यातील पिढीसाठी महत्त्वाची गुंतवणूक असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक दर्जेदार साहित्य आणि काव्यनिर्मितीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी लेखकांना केले.
कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कासेकर, तहसीलदार सरस्वती पाटील, तहसीलदार पूनम दंडीले, मराठी भाषा समितीचे सदस्य पद्माकर कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शेवटी पद्माकर कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.






















