बार्शी – शहर पोलीस ठाण्याच्यावतीने आज शहरात अनधिकृत भोंगे (ध्वनीवर्धक) हटविण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. धार्मिक स्थळांवरील ध्वनीप्रदूषणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
यापूर्वी सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांच्या प्रतिनिधींशी शांतता बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच दि. २२ फेब्रुवारी रोजी शहरात घडलेल्या एका घटनेनंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी बार्शी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलावून धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते.
त्या अनुषंगाने दि. २८ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी आपल्या पथकासह शहरातील विविध धार्मिक स्थळांची तपासणी केली. या मोहिमेत एकूण ११ मशिदींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ८ मशिदींवरील १४ भोंगे उतरविण्यात आले. तसेच ५ मंदिरांवरील ८ भोंगे काढण्यात आले. अशा प्रकारे एकूण २२ अनधिकृत भोंगे (ध्वनीवर्धक) हटविण्यात आले असून शहर ध्वनी प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, मपोसी सोनम जगताप, एएसआय अजित वरपे तसेच इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
बार्शी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यासाठी अशी कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

























