बार्शी – तालुक्यातील गौडगांव येथील सहारा वृद्धाश्रमात निराधार, बेघर, अपंग, घरातून हाकलून दिलेले वृद्ध राहत आहेत. शासनाच्या अनुदानाविना हा वृद्धाश्रम गेली सहा ते सात वर्षे झाले चालू आहे.
कधी कधी समाजात अशी काही माणसे भेटतात, जी केवळ स्वतःसाठी जगत नाहीत तर इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यासाठी जगतात. श्री विनय चौधरी हे त्यापैकीच एक नाव.
सार्थक इंडिया लि., पुणे येथे कार्यकारी संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांनी आपल्या मनातील माणुसकी जपली आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत त्यांनी राहुल भड चालवत असलेल्या ‘सहारा वृद्धाश्रमाला’ ७५ हजार रुपयांची देणगी दिली आहे. या
देणगीमुळे अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण पेटवला.
त्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठाच्या डोळ्यांत आज समाधान आहे. कारण कुणीतरी आपले आहे, ही भावना त्यांना पुन्हा मिळाली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपलेच हात सोडून जातात, तेव्हा अशा माणसांच्या रूपाने देवच भेटतो, असे वाटते.
ही मदत केवळ अन्नधान्याची नव्हती; ती होती प्रेमाची, माणुसकीची आणि आपुलकीची. अशा कार्यातून समाजाला एक मोठा संदेश मिळतो. ‘आपण दिलेलं थोडंसं, कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं.’
आज गरज आहे ती अशाच संवेदनशील मनांची. जी दुसऱ्यांच्या वेदना समजून घेतील आणि मदतीचा हात पुढे करतील. कारण शेवटी, माणूस मोठा त्याच्या पदामुळे नसतो तर त्याच्या कर्तृत्वाने आणि हृदयाच्या मोठेपणामुळे असतो.

























