पंढरपूर – येथील सामाजिक व शिवविचारांना वाहिलेल्या जय महाराष्ट्र युवा मंच या संस्थेला राज्यस्तरीय ‘शिवसन्मान आदर्श संस्था’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तोरणा गडाच्या पायथ्याशी पार पडलेल्या तोरणा महोत्सवात शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जय महाराष्ट्र युवा मंच व रुक्मिणी प्रतिष्ठान या संस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले स्पर्धा, रक्तदान शिबिर, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन अशा विविध सामाजिक व ऐतिहासिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्याची दखल घेत राज्यभरातून यावर्षी संस्थेची आदर्श संस्था म्हणून निवड करण्यात आली.
या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ कंक (येसाजी कंक यांचे वारसदार), राहुल शेलार (शेलार मामा यांचे वारसदार), सचिनजी भोसले (नागपूर गादीचे वंशज), अनिकेत महाराज मोरे (तुकाराम महाराजांचे वंशज), शिवव्याख्याते समाधान हेगडे तसेच शिवशंभू संघटनेचे संस्थापक महादेव पवार उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक श्रीराम साळुंखे , सोहम व्होरा, रामकृष्ण बिडकर, योगेश बारस्कर, ऋषिकेश आगवणे, धीरज गोसावी, रोहित आसबे यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.

























