सांगोला – शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या सांगोला पंचायत समितीच्या एकहाती सत्तेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीने सुरुंग लावला. सभापतीपदी भाजपच्या पुनम इंगवले तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर यांची निवड करण्यात आली.
यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सांगोला पंचायत समिती परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात गुलालाची उधळण करून आणि फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. निवडीनंतर माजी आ.शहाजीबापू पाटील आणि दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात दोघांचा सत्कार संपन्न झाला. या निवडीच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोल्यात राबविलेली ऑपरेशन लोटस ही मोहीम यशस्वी ठरली. ही मोहीम राबविण्यात भाजपचे बाळासाहेब एरंडे आणि जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली.
निवडणुकीच्या काळात आघाडीत सोबत असलेल्या शेकापने कमालीचे क्रॉस वोटिंग करून आपल्याच उमेदवाराचा पराभव केल्याने पंचायत समितीवर असणारी शेकापची सत्ता उलथवून टाकण्याचा निर्धारच साळुंखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी साळुंखे पाटील यांना थेट भाजपमध्ये जाण्याचा आग्रह केला होता. त्यानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत साळुंखे पाटील यांच्या तिन्ही पंचायत समिती सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व शेकापच्या सत्तेला सुरुंग लावला.
सांगोला तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला मी आणि दिपकआबांनी एकत्र असावे असे वाटते. गेल्या दीड वर्षापासून आम्ही एकमेकापासून वेगळे होतो. आम्ही एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढवली. परंतु कुठे ना कुठे आम्ही दोघे एकत्रच असावे असे देवाला सुद्धा वाटत असेल म्हणूनच आज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत.
– माजी आ.शहाजीबापू पाटील
सांगोला तालुक्यातील सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे हा माझा नेहमी आग्रह असतो. आगामी काळात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून सांगोला तालुक्याचा गतिशील विकास व्हावा ही माझी भूमिका आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण सदैव माजी आ.शहाजीबापू पाटील यांच्यासोबत राहू.
– माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील


























